निरवडे महोत्सवात ४ एप्रिलला रंगणार स्वराभिषेक;भजन प्रेमींसाठी अभंगवाणीची मेजवानी…
⚡सावंतवाडी, ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक वैभवात मोलाची भर टाकणाऱ्या ‘निरवडे महोत्सव २०२६’ च्या निमित्ताने भजन प्रेमी आणि संगीत रसिकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता, पुणे येथील विख्यात शास्त्रीय गायक, आणि प्रसिद्ध अभंग गायक नागेश आडगावकर यांच्या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे येथील समृद्ध सांगीतिक वारसा लाभलेले नागेश आडगावकर हे केवळ एक गायक नसून भारतीय शास्त्रीय संगीतातील एक देदीप्यमान तारा आहेत. त्यांच्या पारंपरिक संगीत आणि विशेषतः अभंगगायन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. याशिवाय, आकाशवाणीच्या प्रतिष्ठित संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा मानही त्यांना मिळाला असून, नाशिक येथील ‘इंद्रधनुष्य युवक महोत्सवात’ त्यांनी आपल्या गायकीने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. अशा या राष्ट्रीय स्तरावर नाव गाजवणाऱ्या कलाकाराची उपस्थिती निरवडे महोत्सावाचे खास आकर्षण ठरणार आहे.
नागेश आडगावकर हे प्रामुख्याने रामपूर-सहस्वान घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीचे सादरीकरण करण्यासाठी ओळखले जातात. शास्त्रीय संगीतातील कठीण आलाप-ताना आणि अभंग गायनातील आर्तता यांचा एक दुर्मिळ संगम त्यांच्या आवाजात पाहायला मिळतो. देशातील अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये त्यांनी आपली कला सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नागेश आडगावकर हे निरवडेच्या रूपाने प्रथमच आपली कला सादर करणार आहेत, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि विशेषतः कोकणातील कानसेनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळाने या महोत्सवाच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या कलाकाराला कोकणच्या भूमीत निमंत्रित करून सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा दिली आहे. पुण्याचे हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार पहिल्यांदाच आपल्या भागात येत असल्याने, या भक्तीमय आणि सांगीतिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी निरवडेसह परिसरातील सर्व भजन प्रेमी, रसिक प्रेक्षक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. ४ एप्रिलची ही सायंकाळ सुरांच्या, लयीच्या आणि भक्तीच्या चैतन्याने न्हाऊन निघणार असून या ऐतिहासिक सांगीतिक मेजवानीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
