जिल्ह्यात द्वितीय तर कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक..
⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सन २०२५ मधील आदिशक्ती अभियान स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात कळसुली ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवणारी ग्रामपंचायत ठरली आहे.
आदिशक्ती अभियानांतर्गत आवश्यक असलेल्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत ग्रामपंचायत कळसुलीने अभियानातील सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवले. सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कामकाजामुळेच ग्रामपंचायतीला हा सन्मान प्राप्त झाला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
या यशाबद्दल ग्रामपंचायत कळसुलीचे सरपंच सचिन पारधीये यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावाला हा पुरस्कार मिळवणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.या यशामध्ये सरपंच सचिन पारधीये, ग्रामसेवक प्रशांत वर्दम, समितीचे अध्यक्ष, गावातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटातील महिला, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाल्याने गावात समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
