प्रवीण भोसले यांची मंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी:आचारसंहिता संपताच प्रक्रिया सुरू होणार, मंत्री राणेंच आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.०६-: महाराष्ट्र सरकारचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री नितेश राणे यांना सावंतवाडी येथे चतुर्थ श्रेणी सफाई कामगारांच्या कायमस्वरूपी नेमणुकीसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या पुढाकाराने सावंतवाडी नगरपरिषद येथील सफाई कामगारांचे प्रतिनिधी सुनील परब, सदिंप पाटील व नितीन कदम यांनी यावेळी मंत्री राणें यांच स्वागत करून निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, चतुर्थ श्रेणीतील १७ सफाई कामगारांना वारसाहक्काच्या आदेशानुसार कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आदेशांचे पालन करण्याबरोबरच शासनाच्या लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेतही संबंधित कामगारांची कायमस्वरूपी नेमणूक व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बीड, गेवराई, कराड, शिर्डी, रत्नागिरी व देवगडसह इतर जिल्ह्यांमध्येही अशाच आदेशानुसार सफाई कामगारांना कायमस्वरूपी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.यावर प्रतिसाद देताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता २१ डिसेंबर रोजी संपल्यानंतर तात्काळ सफाई कामगारांच्या कायमस्वरूपी समावेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल.” या शिष्टमंडळात स्वीय सहायक मनोज वाघमारे आणि गोपाळ सावंत यांचीही उपस्थिती होती.तसेच, सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावातील साकव दुरुस्तीची तातडीची आवश्यकता मंत्री राणेंच्या निदर्शनास आणून दिली गेली. मंत्री म्हणाले की, “डिसेंबर अखेरपर्यंत या साकव दुरुस्तीचे काम सुरू होईल आणि लवकरच यावर काम हाती घेतले जाईल.”या निर्णयामुळे सफाई कामगारांच्या कायमस्वरूपी नेमणूक प्रक्रियेला गती मिळेल, तर तिरोडा भागातील पाण्याच्या समस्या दूर होण्यास सहाय्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
