⚡मालवण ता.०६-: नांदेड येथे होणाऱ्या अश्वमेध मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी सिंधुदुर्गची प्रतिभावान खेळाडू लीना धुरी हिची मुंबई विद्यापीठाच्या मुख्य संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी लीना हिने ही कामगिरी बजावत आपल्या क्रीडा कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती घडविली आहे. मुंबई विद्यापीठाच्या संघात १२ मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातून निवड झालेली लीना ही एकमेव खेळाडू आहे. त्यामुळे सिंधुदुर्गला मिळालेला हा मान अभिमानास्पद आहे.
लीना धुरी ही मातोश्री राखी ताई पाटकर अॅकॅडमी, मालवण येथील खेळाडू असून तिला नीलेश पाटकर, ताराचंद पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अश्वमेधसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी सलग निवड होणे हे लीना धुरीच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण प्रदर्शनाचे द्योतक असल्याने क्रीडा क्षेत्रांतून कौतुक करण्यात येत आहे. तिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
