⚡मालवण ता.०५-:
“नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हां महान लोकशाही’… अशा घोषणा देत युथ बीट्स फॉर क्लायमेट, अनुभव शिक्षा केंद्र, इकोमेट्स आणि वनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणात सायकल रॅली काढण्यात आली. मालवण भरड नाका ते वायरी-भूतनाथ मंदिर या मार्गावरून निघालेल्या या रॅलीत टोपीवाला हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोझरी इंग्लिश स्कूल या शाळांमधील एकूण २६ विद्यार्थी सायकलीसह सहभागी झाले होते. या रॅलीतून संविधान व पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली.
या रॅलीपूर्वी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारलेल्या भारतीय संविधानाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. संथगतीने सायकल चालवीत रॅली वायरी-भूतनाथ मंदिर परिसरात दाखल झाली. तेथे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तांबे, सरपंच भगवान लुडबे आणि ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत केले. पटांगणात संविधानाची सामूहिक शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमात पर्यावरणविषयक कायदे हा मुख्य विषय घेण्यात आला होता. युथ बीट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोजा यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगत ऑक्सिजनची किंमत आपण राखायला हवी, असे प्रतिपादन केले. अनुभव शिक्षा केंद्राचे सहदेव पाटकर यांनी शिक्षण हा मूलभूत अधिकार विद्यार्थ्यांना समजावला. वनशक्ती संस्थेचे यथार्थ खवणेकर यांनी सागरतळ स्वच्छता मोहिमेची माहिती दिली. अॅड. ऐश्वर्य मांजरेकर यांनी वृक्षतोड, प्राणी शिकार यांसंबंधी कायदे व शिक्षांबाबत मार्गदर्शन केले. मुलांकडून कचरा न करण्याची, वीज व पाणी जपून वापरण्याची शपथ घेतली. स्वप्निल गोसावी यांनी परिसरातील इरय, काजर, आंबा आदी झाडांची ओळख करून देत झाडांची पर्यावरणीय व जैवविविधतेतील भूमिका विद्यार्थ्यांना समजावली.
रॅलीदरम्यान पोलिसांच्या सूचनेनुसार रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चारुशीला देऊलकर, दर्शन वेंगुर्लेकर, मनीषा पारकर, गौरी कुमामेकर, स्वाती पारकर, प्रविण खवणेकर, सोनल चव्हाण आणि राहुल जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.
