मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच ती जबाबदारी आमची…

लखमराजे भोंसले:निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरीही मोती तलाव जनतेचाच,आ. दीपक केसरकर यांनी राजकारणावर केलेली टीका वेदनादायी : जनता विसरणार नाही..

⚡सावंतवाडी ता.०१-:
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे केवळ निवडणुकीपुरते राजकारण केले जात आहे. आपल्या निवडणुकीत हॉस्पिटल होणार म्हणून मते घ्यायची व आता ते कसे होणार नाही असे सांगून मते मिळवायची हे राजकारण सुरू आहे.
आमच्या सह्या झालेल्याच आहेत वाटल्यास उर्वरित सहीची जबाबदारी देखील आम्ही घेऊ पण जनतेला आवश्यक असलेले मल्टीस्पेशालिटी होणारच, असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोंसले यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले उपस्थित होत्या.
दरम्यान, मोती तलावात इमारती बांधण्याचा संकल्प त्यांचाच असेल कदाचित. त्यामुळे त्यांना तसे सुचत आहे. तसा काँकटिकरण करण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. मात्र, आम्हाला मोती तलावाचा ऐतिहासिकपणा जपायचा आहे. त्यामुळे न्यायप्रतिष्ठ असलेल्या केसचा निकाल कोणाच्याही बाजूने झाला तरीही
हा ऐतिहासिक मोती तलाव जनतेचाच आहे व जनतेचाच राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले, आ. दीपक केसरकर यांनी आजपर्यंत कधीही राजघराण्यावर टीका केली नव्हती. मात्र या निवडणुकीत त्यांनी जी पातळी सोडून टीका केली आहे त्यामुळे अतिव वेदना व दुःख झाले आहे. निवडणुका होऊन जातील मात्र त्यांनी राजघराण्यावर केलेली टीका ही जनतेच्या मनात कायम राहणार आहे. खर तर निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला हव्यात. आम्ही कोणावरही टीका करणार नाही. सावंतवाडीकरांना विकास हवा आहे व तो करण्याची क्षमता ही केवळ भारतीय जनता पार्टी सारख्या मोठ्या पक्षातच आहे. त्यामुळे सावंतवाडीकरांनी एक वेळ आम्हाला संधी द्यावी आम्ही सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करून राजघराण्याचा वारसा जपत उर्वरित कार्य पूर्ण करू.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा पुन्हा पुन्हा उपस्थित करून आ. दीपक केसरकर हे जनतेला संभ्रमित करीत आहेत. आम्ही यापूर्वीही जाहीररित्या सांगितले आहे की शासनाने केलेल्या त्या करारावर आम्ही एकदा नाहीतर दोन वेळा सह्या केल्या आहेत. त्या करारात फक्त ‘ न्यायप्रविष्ठ बाब ‘ एवढाच उल्लेख आहे आणखी कोणत्याही अटी नाहीत. त्यामुळे आपल्या निवडणुकीत तोच करार दाखवून सही होणार व मल्टीस्पेशालिटी होणार म्हणून मते मिळवली व आता आमच्यावर आरोप करून मल्टीस्पेशालिटी होणार नाही असे धादांत खोटे बोलून मते मिळविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.
मात्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणारच, सावंतवाडीकरांना
चांगली आरोग्य सुविधा देणं ही आमची जबाबदारी आहे. वाटल्यास त्या सहीची जबाबदारी आम्ही घेऊ पण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधून दाखवूच, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
युवराज्ञी नगराध्यक्षा झाल्यास मोती तलावाच्या जागेचा निकाल त्या आपल्या बाजूने वळवून घेतील हे देखील केसरकर धादांत खोटे बोलत आहेत. असे कधीही होत नाही. अर्धवट माहितीच्या आधारे जनतेला चुकीची माहिती दिली जात आहे. उलट नगरपरिषदेत चुकीच्या पद्धतीने सुरु असलेल्या गोष्टी आम्ही जननेसमोर आणू या भितीनेच आमच्यावर खालच्या पातळीवर आरोप करून त्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या पॅनल मध्ये चार चार वकील आहेत त्यांनी त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घ्यावा व नंतरच जनतेला माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या निवडणुकीत प्रचारादरम्यान जनतेने जी आपुलकी व जे प्रेम दिलं त्याचा नक्कीच आनंद आहे. जनता या निवडणूकीत आमच्या ठामपणे पाठीशी राहील याचा विश्वास आहे. सावंतवाडी शहराचा विकास ज्या पद्धतीने व्हायला हवा होता त्या दिशेने होत नसल्यानेच या निवडणूकीत प्रत्यक्ष उतरण्याचा निर्णय घेतला. सावंतवाडी शहर हे पर्यटनातून विकसित होणारे शहर आहे. त्यामुळे या शहराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करावा हाच आमचा अजेंडा आहे व निवडून आल्यानंतर जनतेचा विकास हाच ध्यास समजून संस्थानाने यापूर्वी सावंतवाडीकर नागरिकांसाठी जे कार्य केले आहे ते पुढे नेऊ असे देखील त्यांनी ठामपणे सांगितले.
सावंतवाडीकर जनतेला विकास हवा आहे. बदल हवा आहे हा बदल आता पार्टी सारखा देशात व राज्यात सत्तेत असलेला पक्षच करू शकतो. त्यामुळे जनतेला आवाहन आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करून आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवकांना निवडून द्यावे तुमच्या विकासाची हमी आम्ही घेतो,असा विश्वास युवराज लखमराजे यांनी व्यक्त केला.
देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आहे. पंतप्रधान मुख्यमंत्री हे भारतीय जनता पार्टीचेच आहेत. पालकमंत्री देखील आमच्यासोबत आहेत. त्यामुळे या ठिकाणी विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही हे जनतेच्या लक्षात आले असल्यामुळे
भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व नगरसेवक पदासाठीचे सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.

राजघराण्यातील सुनांवर व महिलावर होणारे आरोप चालणार नाहीत : शुभदादेवी भोंसले

गेली ४० वर्ष मी या घराण्यात आहे. लोकांनी खूप प्रेम आम्हाला दिलं.
आ. दीपक केसरकरांना आम्ही नेहमीच मान सन्मान दिला. या घराण्याने सावंतवाडीकरांना बरंच काही दिलं आहे. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब माझ्या सुनेवर ज्या पद्धतीने टीका करीत आहेत ते योग्य नाही. नीट शब्द वापरा, इथे आलेल्या सगळ्या सुना विविध प्रांतातील आहे त्यामुळे टीका करताना विचार करून करा, महिलांवर टीका कराल तर ते चालणार नाही. जर तुमच्यासोबत युवराज्ञी असत्या तर एवढं तुम्ही बोलला नसता, दीपक केसरकर यानीही याचा विचार करावा, असा परखड सल्ला राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी दिला.

You cannot copy content of this page