निकृष्ट कामामुळे विहिरीची जाळी दोन महिन्यात निकामी…

गुरुदास गवंडे: १४ डिसेंबरला उपोषणाचा इशारा..

बांदा/प्रतिनिधी
निगुडे तेलवाडी येथील सार्वजनिक विहिरीवरील लोखंडी जाळी बसविणे व गाळ काढणे या कामात गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निगुडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केला आहे. या कामाची खातेनिहाय चौकशी करून कार्यवाही न झाल्यास १४ डिसेंबर रोजी उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२२-२३ मध्ये १५ व्या वित्त आयोगातून ७० हजार रुपये एवढी रक्कम या कामासाठी मंजूर झाली होती. मात्र प्रत्यक्षात दोन वर्षांनंतरही काम सुरू झाले नव्हते. या दिरंगाईचा निषेध म्हणून आपण ११ मार्च २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यानंतर कामाची निविदा निघाली व एप्रिल २०२५ अखेरपर्यंत काम पूर्ण करायचे होते.
परंतु, संबंधित ठेकेदाराने काम ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण केले. यामध्ये बसविण्यात आलेली लोखंडी जाळी फक्त दोन महिन्यांतच पूर्ण गंजून निकामी झाली. शिवाय अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे चॅनल बसविण्याचे कामही अपूर्ण राहिल्याचे गवंडे यांनी निदर्शनास आणून दिले. तक्रारीनंतर ग्रामीण पुरवठा विभागाने पाहणी करून चॅनल बसविण्यात आले.
या सर्व अनागोंदी कारभारास ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर हे जबाबदार असल्याचा आरोप गुरुदास गवंडे यांनी केला आहे. “ठेकेदाराकडून निकृष्ट काम करून घेतल्यामुळे विहिरीचे काम टिकाऊ राहिले नाही. अशीच परिस्थिती राहिली तर गावातील भविष्यातील कामे एक वर्षही टिकणार नाहीत.
यासंदर्भात श्री गवंडे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून कामाची खातेनिहाय चौकशी व अंदाजपत्रकाप्रमाणे दुरुस्ती न झाल्यास १४ डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
फोटो:-
निगुडे येथे निकृष्ट करण्यात आलेले विहिरीच्या लोखंडी जाळीचे काम.

You cannot copy content of this page