कुठल्याही अमिषाला बळी न पडता शिवसेनेला एकजुटीने मतदान करावे…

आमदार दीपक केसरकर: प्रभाग नऊ मध्ये घेतली शिंदे शिवसेनेने प्रचारात आघाडी..

⚡सावंतवाडी ता.२९-:
आमच्या पॅनलमध्ये सर्व सुशिक्षित उमेदवार असून त्यांनी शहराच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे कोणीही कुठल्याही अमिषाला बळी न पडता शिवसेनेला एकजुटीने मतदान करावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी प्रभाग क्र. ९ मध्ये आयोजित कॉर्नर सभेत बोलताना केले.

ते पुढे म्हणाले की, “आज जो पैशाचा बाजार सुरू आहे, असा मी आजवर कधीच पाहिलेला नाही. तुमच्यावर कितीही दबाव येवो वा प्रलोभन दिले जावो, तुम्ही विचलित न होता आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी धनुष्यबाण चिन्हावर मतदान करा.”

केसरकर यांनी आपल्या तब्येतीबाबत सांगताना, “डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असतानाही सावंतवाडीवरील प्रेमामुळे मी प्रचारात उतरलो आहे. सर्वांच्या घरी जाणे शक्य नसल्याने मनापासून दिलगिरी व्यक्त करतो,” असे नमूद केले.

“आजपर्यंत तुम्ही मला जशी साथ दिली आणि चार वेळा विजयी केले, तशीच साथ आमच्या सर्व उमेदवारांना द्या. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सोबत उभे राहा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page