⚡मालवण ता.२८-: ओसरगाव येथील सिंधुदुर्ग भवन प्रमाणे मालवणात उद्योग भवन उभारले गेल्यास इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल याहेतूने कुंभारमाठ येथे माझ्या मालकीची जी जमीन आहे, ती जमीन उद्योग भवनासाठी विनामोबदला देण्यास मी तयार आहे जेणे करून मालवण तालुक्यातील बेरोजगार तरुण तरुणी रोजगारासाठी मालवण सोडून जाणार नाहीत. या जागेत मालवण तालुक्याचे उद्योगभवन होण्यासाठी आपण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याबरोबर चर्चा केली आहे ते होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील त्याचप्रमाणे माझ्या प्रभागात गतिमान विकास कार्यासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील राहणार आहे एकूणच प्रचाराच्या पहिल्या फेरीपासून मिळालेला प्रतिसाद पाहता, आपल्याला विजयाची खात्री असल्याचा विश्वास मालवण प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेना पक्षाच्या वतीने नगरसेविका उमेदवार म्हणून निवडणूक लढाविणाऱ्या सौ. पूनम नागेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी मालवण प्रभाग चार मधून शिंदे शिवसेनेतर्फे सौ. पूनम नागेश चव्हाण आणि सिद्धार्थ जाधव हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
यावेळी बोलताना सौ. पूनम चव्हाण म्हणाल्या. या भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांनी गेली कित्येक वर्षे प्रभागातील रस्ते केले नाहीच, गटारांचीही बांधकामे केली नाहीत, मात्र काही प्रमाणात जी गटारे अस्तित्वात होती त्यांची खोदाई देखील केली गेली नाही, त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहे. या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला दिल्यास निश्चितपणे प्रभागातील रस्ते, गटारांची बांधणी करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील मी निवडणूक लढावीत असलेल्या प्रभाग ४ मध्ये मागास वर्गीय वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या वस्तीच्या विकासाकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. मागासवर्गीय विकास निधी या प्रभागात म्हणावा तसा खर्च न झाल्याने हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे. आम. निलेश राणे यांच्या माध्यमातून मागास वर्गीय भागातच नव्हे तर यां प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील.
गेली कित्येक वर्षे मागासवर्गीय वस्तीच्या ठिकाणी असणारी घरे ही दुसऱ्यांच्या मालकीच्या जागेवर आहेत. असेसमेन्ट उताऱ्यावर या भागातील लोकांचे नाव असले तरी या मागासवर्गीय वस्तीच्या जमिनीचे मालक वेगळे आहेत. त्यामुळे घरकुल योजनांचा लाभ यां भागातील नागरिकांना मिळत नाही, तसेच इतर सोयी सुविधाही मिळत नाहीत, आणि म्हणूनच भागातील विकासासाठी काय करता येईल, याबाबत आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असेही सौ चव्हाण म्हणाल्या
नगरपालिकेच्या वतीने ज्या नागरी सुविधा देण्यात येतात त्या सुविधाबरोबरच प्रभागात अद्यावत समाजमंदिर, उद्यान, वाचनालय यासारख्या गोष्टी होण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे सांगून त्या म्हणाल्या निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधीं कडून मालवणवासीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. नागरिकांना झपाट्याने विकास हवा आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न, आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे.
त्यामुळे मालवणच्या नगरपालिकेच्या वतीने ज्या नागरी सुविधा देण्यात येतात त्या सुविधा देण्याच्या दृष्टीने तसेच समाजमंदिर, उद्यान, वाचनालय यासारख्या गोष्टी होण्यासाठी आपला प्रयत्न राहील असेही सौ. पूनम चव्हाण म्हणाल्या.
