लखमराजे भोसले:मोती तलावात हॉटेल प्रस्ताव कोणी आणला होता..?
⚡सावंतवाडी ता.२८-: मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबतचा सामंजस्य करार हा शासनाकडून करण्यात आला होता आमच्याकडून नाही. त्यामुळे त्यात आम्ही अटी शर्ती घालण्याचा प्रश्नच येत नाही.
त्या करारावर आम्ही एकदा नाही तर दोन वेळा सह्या केल्या आहेत. उर्वरित सही घेण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. त्यासाठी दोन एकर जागा आम्ही मोफत दिली आहे. असे असताना केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेला चुकीची माहिती देणे योग्य नाही. स्वतःच्या निवडणुकीत त्या कराराचा फायदा घेतला गेला व आता गैरफायदा घेतला जात आहे. राजकारणासाठी त्याचा वापर कोण करत आहे, असा सवाल सावंतवाडी संस्थांचे युवराज तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले यांनी केला.
तर, सावंतवाडीचं सौंदर्य हा ऐतिहासिक मोती तलाव आहे. त्यामुळे हे सौंदर्य जपण्यासाठी व त्याचे संवर्धन करण्यासाठी राजघराण्याने नेहमीच प्रयत्न केले आहेत व शेवटपर्यंत करीत राहू. तलावामध्ये कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू देणार नाही आणि आम्ही करणारही नाही. आज मोती तलावात कन्स्ट्रक्शन उभारलं जाणार असा गैरसमज पसरविला जात आहे मात्र २००३ मध्ये याच तलावात हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव कोणी आणला होता हे जाहीर करावं, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
