⚡मालवण ता.२८-: मालवण सावंतवाडी वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दि ३०. नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून मालवण–वेगुर्ले–सावंतवाडी येथे प्रचार सभा होणार असल्याची माहिती मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दिली
शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात मालवण येथील प्रचार सभेने संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. त्यानंतर वेगुर्ला येथे सायंकाळी ५ वाजता, तर सावंतवाडीतील महत्त्वाची सभा सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत विशेषतः तुटलेल्या युतीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे कोणती भूमिका मांडणार? यावर सर्वांचे डोळे खिळले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या सभांचा स्वर, संदेश, आणि राजकीय बाण कशाकडे वळणार याबाबत विविध तर्क–वितर्कांना उधाण आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) पुन्हा एकदा जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना शिंदे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जिल्हाभरातील शिवसैनिकांमध्ये यानिमित्ताने मोठी उत्सुकता असून स्थानिक राजकीय वर्तुळातही या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
३० नोव्हेंबरचा शिंदे दौरा सिंधुदुर्गच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणार का? की विद्यमान वातावरणाला नवा वेग देणार? हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष आता या तीन सभांकडे आहे.
