⚡मालवण ता.२८-: माझ्या प्रभागातील लोकांसाठी मी सदैव उपलब्ध असतो, सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असतो. माझा प्रभाग हे माझेच कुटुंब मानून प्रभागाच्या विकासासाठी, समस्या सोडविण्यासाठी मी आजपर्यंत काम केले आहे. प्रभागातील प्रत्येक व्यक्तीकडे माझा मोबाईल नंबर आहे. घराघरात माझा चेहरा आणि काम पोहचले आहे. माझी ही धडपड आज जनतेचा आशीर्वाद बनून पुढे येत असून प्रभाग दहा मधून नगरसेवक म्हणून माझा विजय नक्की आहे, असे उबाठा शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार तपस्वी मयेकर यांनी सांगितले.
मालवण नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग दहा मध्ये उबाठा शिवसेनेतर्फे माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांचे सुपुत्र आणि जनसेवेसाठी २४ तास उपलब्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले तरुण कार्यकर्ते तपस्वी मयेकर व हॉटेल उद्योजिका सौ. राधिका मोंडकर हे दोन उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मयेकर आणि मोंडकर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचारफेरीला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. या प्रभागातून आपणास मतदारांचा पाठिंबा मिळत असल्याचे दोन्ही उमेदवारांनी सांगितले.
यावेळी तपस्वी मयेकर म्हणाले, ठाकरे शिवसेनेकडून माजी आमदार वैभव नाईक यांनी या मतदारसंघात दिलेल्या विकासनिधीमुळे मोठ्या प्रमाणात जनतेच्या मुलभुत गरजा पूर्ण करण्यात यश आले. माझ्या प्रभागातील कोयंडे घर ते दांडेश्वर मंदिर रस्ता आणि वायरी तारकर्ली रस्ता ते शिदिया देवालय हे दोन नवीन रस्ते करण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. यामुळे या परिसरातील नागरिकांना हक्काचा मार्ग उपलब्ध झाला आहे. प्रभागातील तानाजी चौक, शिदिया देवालय, मारुती मंदीर, शिवनेरी चौक, मोरेश्वर देवालय अशा ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले आहेत. प्रभागात स्टीटलाईटचे जाळेच करण्यात आले आहे. प्रभागातील आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवून जनतेला कमी दाबाच्या वीज समस्येपासून सोडविले आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने एरियल केबल फिरण्यात आली आहे. त्यामुळे झाडांच्या फांद्या अगर झावळे पडून आता वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायमची संपली आहे. प्रभागातील अनेक ठिकाणी गटारांवर लाद्या घालण्यात आल्या आहेत. गटारांची बांधकामे करण्यात आली आहेत. प्रभागातील तुळजाभवानी मंदिराला सभामंडप बांधून देण्यात आला आहे. तर मारुती मंदिरासमोर काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मतदारांनी जी जी कामे सांगितली, ती ती पूर्ण करण्याचे प्रामणिकपणे प्रयत्न केले आहेत, असेही मयेकर म्हणाले.
माझ्या प्रभागातील एखाद्या रुग्णाला मुंबई, पुणे, कोल्हापूर याठिकाणी उपचारासाठी न्यायचे झाल्यास मी कधी फोन करून संपर्क साधून देत नाही. तर थेट त्या रुग्णाला घेऊन तात्काळ संबंधित शहरात दाखल होतो. मी जनसेवेसाठी प्रसंगी माझ्या कुटुंबातील कार्यक्रमांमध्येही कधी कधी सहभागी होत नाही, पण प्रभागातील लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहत आहे. मला जनसेवा आणि सामाजिक काम करण्यात आनंद आहे, असेही मयेकर म्हणाले.
