२७ नोव्हेंबरपासून बांद्यात ठिय्या आंदोलन; समाधान न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा..
बांदा/प्रतिनिधी
वन्य हत्ती ‘ओंकार’ वरील अत्याचार प्रकरणी वनखात्याने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा आरोप करत वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. दिलेल्या आश्वासनांना आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने २७ नोव्हेंबर पासून बांदा येथील श्रीराम चौक येथे ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी लेखी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच समाधानकारक तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणासह जन आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे.
१० नोव्हेंबर रोजी श्री गवस यांनी ओंकार हत्तीला लाकडी दांड्याने मारहाण करणारे तसेच सुतळी बॉम्ब फेकून त्याला मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, दोषींना सेवेतून निलंबित करावे तसेच ओंकारला त्याच्या नैसर्गिक अधिवासात ड्सोडण्यात यावे या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करत काही आश्वासने दिली होती. मात्र ही आश्वासने पूर्ण न करता वन खात्याने दिशाभूल केल्याचा आरोप श्री गवस यांनी केला आहे.
सुतळी बॉम्बचा वापर थांबवू अशी हमी दिल्यानंतरही आठ दिवसांतच पुन्हा बॉम्ब फोडण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच ओंकारला नैसर्गिक अधिवासात हलवण्याची मागणीही प्रलंबितच राहिल्याची खंत व्यक्त केली आहे. वन खात्याच्या चुकीच्या माहितीमुळे तसेच अपूर्ण आश्वासनांमुळे हा संघर्ष अपरिहार्य झाल्याचे गवस यांनी स्पष्ट केले.
२७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आंदोलनादरम्यान माझ्या बाबतीत काहीही अनिष्ट घडल्यास त्यास वन विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे परिसरात पुन्हा एकदा ओंकार प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
