रवींद्र चव्हाण:पर्यटन व पायाभूत सुविधा उभारणीला गती देण्याची ग्वाही..
⚡मालवण ता.२५-: देशाच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाच्या असून या संस्थांच्या निवडणुका महत्वाची भूमिका पार पाडतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे, त्यासाठी भाजपचे सरकार आणणे गरजेचे आहे, देशात राज्यात भाजप एनडीएचे सरकार आहे, मालवण शहरातील सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी एक विचाराचे सरकार आवश्यक आहे. यासाठी सार्वत्रिक निवडणुकीत विचार करून योग्य व्यक्तीला मतदान करणे, योग्य विचार सरणीला मतदान करणे आवश्यक आहे. मालवण वासियांनी चुकीच्या व्यक्ती व चुकीच्या विचारधारांच्या हाती सत्ता देऊ नये, मालवणवासियांनी नगरपालिकेवर शतप्रतिशत भाजपची सत्ता आणावी असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवण येथे प्रचार सभेत बोलताना केले.
मालवण नगरपालिका निवडणुकीनिमित्त भाजपची प्रचार सभा मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या पटांगणवर आज सायंकाळी उशिरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर मत्स्य व बंदर विकास मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, संध्या तेरसे, सौ. कोरगावकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत, यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार केणी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, अमृता फाटक, पंकज सादये,सुवर्णा वालावलकर, रोहन पेंडूरकर, संतोषी कांदळकर, यतीन खोत, महानंदा खानोलकर, चंद्रशेखर कुशे, महिमा मयेकर, सौरभ ताम्हणकर, दीपाली वायंगणकर, संतोष शिरगांवकर, मरीना फर्नांडीस, संमेश परब, अन्वेषा आचरेकर, रमेश हडकर, सेजल परब आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, अपघाताने मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन काम करण्याची संधी मिळाली, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध संकल्पना आपण राबविल्या. एक विचाराचे सरकार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत असणे आवश्यक आहे. मालवण शहरातील सिंधुदुर्ग किल्ला राजकोट किल्ला, मोरयाचा धोंडा यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे, येथील तरुणांचे स्थलांतर थांबले पाहिजे, त्यासाठी काय करायचे याचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तयार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही मतदान करा, २ तारीख ला होणारे मतदान हे पुढील पिढीचे भविष्य ठरविणारे असेल. यासाठी मतदारांनी विचलित न होता कमळाचे बटण दाबावे. आपले मतदान देश हिताला आणि मालवणच्या हितासाठी असेल, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, मालवणचा पर्यटन दृष्ट्या विकास करायचा आहे, पर्यटनातून येथील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढेल याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
देशात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे मालवणचा विकास साधण्याची चांगली पारिस्थिती निर्माण झाली आहे. विकास हाच भाजपचा अजेंडा आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या इकडच्या तिकडच्या गोष्टीकडे उमेदवारांनी लक्ष देऊ नये, निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत राहतात, त्यात आपण अडकून पडलो तर जनता विचलित होते, विकसाचा विचार घेऊन जनतेसमोर जावे, तरच जनता आपल्या बाजूने राहील, विकासाच्या अजेंड्यावर बोलून मत मागितले पाहिजे, विकास करण्यासाठीच निवडणुका लढविल्या जातात, पर्यटन विकासाच्या बाबतीत मालवणचेच नाव घेतले पाहिजे, असा विकास करण्याची जबाबदारी आमची असेल हा विश्वास देतो, असेही ना. राणे म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी काहींच्या नजरेत मी चांगली उमेदवार व कर्तृत्ववान स्त्री होते. मात्र गेले काही दिवस विरोधकांकडून माझ्या विषयी जनतेत संभ्रमावस्था निर्माण करून माझे खच्चीकरण केले जात आहे. यावर भाजप नेत्यांनी तोडगा काढावा, समाजाला उपयोगी पडण्यासाठी, मालवणचा विकास साधण्यासाठी मी राजकारणात पदार्पण करत आहे, जनतेने मला साथ द्यावी, असेही त्या म्हणाल्या. यावेळी भाजप पदाधिकारी व उमेदवार यांनीही विचार मांडले.
