कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगली आहे.एकीकडे भाजपा, तर दुसरीकडे शहर विकास आघाडी आणि त्यांच्या पाठिशी शिंदे गट असल्याने राजकारणात खरी रंगत आली आहे. कारण भाजपसोबत नितेश राणे आणि शहर विकास आघाडीसोबत निलेश राणे म्हणून दोन्ही राणेबंधू कणकवलीत आमने-सामने राजकीय रंगमंचावर उभे आहेत.
यात सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या पोस्ट, फोटो, प्रचाराचे प्रयोग सुरू आहेतच…पण सध्या शहरात सर्वाधिक चर्चा आहे ती एका समर्थकाच्या गाडीची ! होय, संदेश पारकर यांच्या एका चाहत्यानेच आपल्या स्वतःच्या गाडीवर, मागील नंबर प्लेटच्या जागी थेट संदेश पारकर व आमदार निलेश राणे यांचा मोठा पोस्टर फोटो लावला आहे.
त्यावर मजकूर आहे तो “संदेश –निलेश राणेंचा विजय कणकवलीकरांचा!” बस! एवढं होताच गाडीपेक्षा तो फोटो आणि ती प्लेटच अधिक प्रसिद्ध झाली.शहरात यावर जोरदार विनोद, चर्चा आणि ताशेरे सुरू आहेत.“ही नंबर प्लेट आहे की प्रचाराची ‘मोबाईल होर्डिंग’?”
एका समर्थकाच्या गाडीवरील या ‘क्रिएटिव्ह प्लेट’ने निवडणूक वातावरणात नवा रंग भरला आहे. प्रचारासाठी नवे फंडे वापरले जात असले तरी हा प्रकार मात्र सध्या सर्वाधिक आकर्षक ठरतोय.
