⚡मालवण ता.२५-: मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी मालवण प्रभाग सात अ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार तेजस नेवगी यांनी प्रभागात जोरदार प्रचार मोहीम राबवित एक फेरी पूर्ण करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन तेथील मतदारांशी संवाद साधणारे ते पहिलेच उमेदवार ठरले आहेत. आज निवडणूक प्रचाराला कमी वेळ असला तरी सर्व मतदारांपर्यंत पोहचून प्रभाग विकासासाठी माझ्या संकल्पना मांडत आहे. प्रभाग सात हा पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचा असून मोठी मोठी आश्वासने देण्यापेक्षा येथील विकासाच्या दृष्टीने ट्रान्सफॉर्मर, स्ट्रीट लाईट, गटारे, स्वच्छता, सुशोभीकरण, दर्जेदार रस्ते अशा ज्या मूलभूत गरजा व सोयी सुविधा आवश्यक आहेत त्या उपलब्ध करून देण्याचा आणि पर्यटन विकासच्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील. जनतेने एक तरुण व नवे व्हिजन असलेला उमेदवार म्हणून मला मतदानरुपी साथ द्यावी, असे आवाहन उबाठा शिवसेना पक्षाचे उमेदवार तेजस नेवगी यांनी केले आहे
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी मालवण प्रभाग सात अ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार तेजस नेवगी हे प्रभागात जोरदार प्रचार मोहीम राबवित आहेत. त्यांच्यासमवेत उबाठा शिवसेनेच्या सात ब च्या महिला उमेदवार गौरी मयेकर व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा करलकर या देखील या प्रभागात प्रचार करत आहेत. नेवगी यांच्या सोबत उबाठा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचारादरम्यान बोलताना तेजस नेवगी म्हणाले, उबाठा शिवसेना पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्याला तरुणाला मालवण शहरातील अतिशय महत्वाच्या अशा प्रभाग सात मधून नगरसेवक पदाची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखविला आहे. कमी वेळेत आपण मतदारांच्या भेटी घेतल्या असून या प्रभागातील मतदार असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील काही रहीवाशांच्याही आपण भेटी घेत प्रचार केला. प्रभाग सात हा मालवणच्या पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या प्रभागात अनेक मूलभूत सुविधाची कमतरता आहे. येथील जनतेने मला नगरसेवक म्हणून निवडून दिल्यास मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहणार आहे. प्रभाग सात मध्ये पर्यटन दृष्ट्या अनेक व्यवसायिकानी हॉटेल्स व होम स्टे उभारले आहेत. मात्र येथे वीज पुरवठ्याच्या अनेक समस्या उद्भवत असल्याने अधिकचे ट्रान्सफॉर्मर बसविणे आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यावर आपले प्राधान्य असणार आहे. ठिकाणी गटार व्यवस्था अपुरी असून बंदिस्त गटार बांधणीसाठी आपण प्रयत्न करू. तसेच पर्यटन दृष्ट्या या भागात विविध ठिकाणी रॉक गार्डनच्या धर्तीवर सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. तसेच बंदर जेटी परिसरात मागच्या बाजूला सिंधुदुर्ग किल्ला दिसेल असा सेल्फी पॉईंट आपण निर्माण करू. येथील रस्ते सुस्थितीत करण्यावर आपला भर राहील, असेही नेवगी म्हणाले.
आपणास नेहमीच समाजकार्याची आवड राहिली आहे. उबाठा शिवसेना पक्षाने दिलेली उमेदवारी आपण स्वीकारत जनतेने मतदानातून आपणास साथ दिल्यास नगरसेवक म्हणून समाजकार्याची आणि विकासकार्याची नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सज्ज आहोत, प्रभागात जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे, असेही तेजस नेवगी म्हणाले.
