⚡सावंतवाडी ता.२३- : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष आघाडी घेतली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन ते नागरिकांच्या गाठीभेटी घेत असून, जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.
यावेळी नागरिकांनी मांडलेल्या विविध स्थानिक समस्या, विकासकामातील अडथळे आणि इतर प्रश्न मनापासून ऐकून घेत पालकमंत्री राणे यांनी “निवडणुकांनंतर या सर्व प्रश्नांचे निश्चित निराकरण करण्यात येईल” असे आश्वासन दिले.
ते पुढे म्हणाले की, “देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या विकासासाठी निधीची कुठेही कमतरता भासू देणार नाही. तुम्ही फक्त आमच्या उमेदवारांना विजयाच्या आशीर्वादाने पाठिंबा द्या; तुमचे सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावू,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
