संदेश पारकर यांचा समीर नलावडे यांच्यावर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप…

कणकवली : सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर कणकवलीतील नारायण राणेंचा बंगला जाळण्यात समीर नलावडे यांचा प्रमुख सहभाग होता, असा गंभीर आरोप शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला. नलावडे यांचे राणे कुटुंबावरील प्रेम हे केवळ दिखाऊ असून याची कल्पना स्वतः राणे कुटुंबीयांनाही आहे, असेही ते म्हणाले.

आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पारकर बोलत होते. ते म्हणाले, भिसे प्रकरणानंतर नलावडे यांनी जे प्रकार केले होते ते सर्वांना माहीत आहेत. तरीसुद्धा मागील निवडणुकीत निलेश राणेंनी त्यांना स्वाभिमान पक्षाकडून उमेदवारी देऊन मोठेपणा दाखवला. नितेश राणे यांनी मात्र त्या घटनेचा विसर पाडला आहे का? आज पुन्हा उमेदवारी देणे हे नलावडेंवरील कृपा नसून विस्मरणाचा भाग दिसतो.”

पारकर यांनी शहरातील काही वादग्रस्त घटनांचा उल्लेख करत गंभीर प्रश्न उपस्थित केले. कणकवलीतील टोणेमारे चाळीला आग कोणी लावली? रेवडेकर हॉस्पिटल व कोहिनूर लॉज कोणत्या अधिकाराने आणि कोणाला कल्पना न देता रातोरात जमीनदोस्त करण्यात आले? एसटी बसस्थानकासमोरील इमारतीवरही असा प्रकार झाला. जमीनमालक किंवा भाडेकरू यांनाही माहिती न देता कारवाई केली गेली. लोकांचे संसार उध्वस्त करणे हीच या गटाची प्रवृत्ती आहे,” असा आरोप त्यांनी केला.

पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांवर जनतेचे शोषण केल्याचा आरोप करत पारकर म्हणाले की, “ही भ्रष्ट व्यक्तींची टोळी आहे. पराभव जवळ आल्याची चाहूल लागताच हे लोक दुसऱ्यांवर आरोप करण्यास सुरुवात करतात. कणकवलीची जनता मतदानाच्या दिवशी त्यांना योग्य जागा दाखवेल.

You cannot copy content of this page