कणकवली शहराच्या विकासासाठी भाजपाला सत्ता द्या – पालकमंत्री नितेश राणे…

कणकवली : कणकवली शहराला आणखी वेगाने विकसित करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले. “पाच वर्षांपूर्वी मी आमदार होतो, आज मी राज्य मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आमदार असताना कणकवलीचा कायापालट केला, आता मंत्री म्हणून शहरासाठी विशेष पॅकेज मागितले तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल,” असे ते म्हणाले.

भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित असलेल्या या पत्रकार परिषदेत, राणे यांनी मतदारांना भाजपाला साथ देण्याचे आवाहन केले.
“समीर नलावडे आणि भाजपच्या उमेदवारांना मत म्हणजे नितेश राणेंना मत; कणकवलीच्या विकासाला मत,” असे ठामपणे सांगत त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला.

मागील पाच वर्षातील विकासाची यादी मांडली

कणकवली २०१८ पूर्वी आणि आजमध्ये प्रचंड बदल झाल्याचा दावा करताना राणेंनी रस्त्यांचे जाळे, रिंग रोड, जानवली नदीवरील पूल, शहराचा विस्तार, नव्या सुविधा आणि वाढलेली आर्थिक उलाढाल यांचा उल्लेख केला.
खासदार नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली पुढील २५ वर्षांचा विचार करून विकास आराखडे तयार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवीन प्रकल्पांची घोषणाही

  • शहरात १० कोटींचे सुसज्ज नाट्यगृह – प्रस्ताव सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे
  • मराठा मंडळाचे भव्य भवन – फेब्रुवारीत पायाभरणी
  • पोदार इंटरनॅशनल CBSE शाळेमुळे वाढलेली शैक्षणिक गुणवत्ता
  • नवीन भाजी मार्केट व बेसमेंट पार्किंग– जुने मार्केटचे भूखंड नगरविकास खात्याकडे हस्तांतरित
  • पुढील टप्प्यात स्विमिंग पूल, क्रिकेट ग्राउंड, जॉगिंग ट्रॅकसह स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
  • अद्यावत नगरवाचनालय पूर्णत्वास

कोविड काळातील सेवाभावी कामांचा उल्लेख

कोविडच्या संकटात भाजपाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरसेवकांनी उभारलेल्या कोविड सेंटरचा, ‘कमळ थाळी’च्या उपक्रमाचा, तसेच खाऊ गल्ली आणि कणकवली पर्यटन महोत्सव सुरू ठेवण्याचा उल्लेख करत राणेंनी नगरसेवकांच्या कामाचे कौतुक केले.

“कणकवलीकरांच्या कोणत्याही नागरी दाखल्याला कधी अडवले नाही. शहराला आपले घर मानून सेवा केली,” असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

शांत, विकसित कणकवलीसाठी आवाहन

कणकवलीला शांत, सुरक्षित आणि विकसित शहर बनवण्यासाठी भाजपाने केलेल्या प्रयत्नांमुळेच नागरिकांचा विश्वास मिळत असल्याचा दावा करत—
“आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय,” असे राणे म्हणाले.

पुढील पाच वर्षांत कणकवली शहराला आणखी उंचीवर नेण्यासाठी भाजपाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

You cannot copy content of this page