कणकवली शहरवासीयांनी आम्हाला एकदा संधी द्यावी…

राजन तेली:खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या शहराचा आम्हाला विकास करायचाय..

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच शहर विकास आघाडीचा प्रयोग सुरू असून तो अर्थात विकासासाठी आहे. कणकवली शहरवासीयांनी आम्हाला एकदा संधी द्यावी. मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ. मधल्या काळात कणकवलीतील जनता भयभीत दिसत होती, पण निलेश राणे येथे आले आणि त्यांनी कोणावरही टीका न करता आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यामुळे कणकवलीत आता आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगले वातावरण आहे.

आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. यावेळी उबाठा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, देवगड तालुकाप्रमुख वैभव साळसकर, शंकर पार्सेकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे आदी उपस्थित होते.

तेली म्हणाले, निलेश राणेंनी कुडाळ मालवण मतदार संघ व तेथील नगरपरिषदांच्या संदर्भात विकासाचे मॉडेल केले आहे, तसेच मॉडेल आम्ही कणकवलीत करत असून याविषयी दोन दिवसातच नागरिकांना माहिती देऊ. कणकवली हे महामार्गावरील शहर आहे. मात्र येथे अद्याप अनेक बाबींची पूर्तता व्हायची आहे. या शहरामध्ये सुसज्ज असे नाट्यगृह, गार्डन याची कमतरता असून डासांचाही प्रादुर्भाव आहे. इथल्या ड्रेनेज सिस्टीमसाठी मी आमदार असताना निधी दिला होता. मात्र हे काम अद्यापही झालेले नाही. या शहरात अद्याप चांगले स्टेडियम नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, अर्थातच खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या शहराचा आम्हाला विकास करायचा आहे.

या कणकवली शहरात काहीच विकास कामे झाली नाहीत, असे आम्ही अजिबात म्हणणार नाही. मात्र कणकवली शहरात ३६ आरक्षणे असून ती विकसित झालेली नाहीत. वषार्ला किमान तीन ते चार आरक्षणे विकसित व्हायला हवी होती. या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त गार्डन्स वेंगुर्लेत आहेत. तेथील नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, फिश मार्केट अशा चांगल्या बाबी झाल्या आहेत. कचरा सुविधेबाबत वेंगुर्ले नगरपरिषदेने अनेक बक्षिसे मिळविली आहेत. या सर्व गोष्टी इच्छाशक्तीच्या जोरावर झाल्या आहेत. अशाच बाबी आम्हाला कणकवलीतही करायच्या आहेत, असेही तेली म्हणाले.

खा. राणेंचा बंगला जाळताना कोण होते ?

कणकवलीकरांनी शहर विकास आघाडीला एकदा संधी द्यावी विकास काय असतो हे कणकवली शहराला आणि दाखवून देऊ, अशी ग्वाही शिंदे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिली. जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप युती होऊ शकली नाही त्याला भाजप पक्षच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. खा. नारायण राणे यांचा बंगला जाळताना कोण होते, असा सवालही त्यांनी समीर नलावडे यांच्याविषयी केलेल्या एका प्रश्नावर केला.

सतीश सावंत म्हणाले, संदेश पारकर १९९२ पासून कणकवलीचे सरपंच होते. जनतेमधूनच पारकर यांनी निवडणूक लढवावी व त्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन केली जावी, अशी मागणी केली गेली होती. त्यासाठीच आम्ही पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून शहर विकास आघाडी केली. आघाडीला सर्व पक्षांचा, स्वयंसेवी संस्थांचाही पाठिंबा आहे. संदेश पारकर हा आश्वासक चेहरा असून शहर विकास आघाडीचे सर्व १७ ही नगरसेवक चांगले आहेत. त्यामुळे आघाडीला नक्कीच बहुमत मिळेल. तर उद्या शहर विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शहराला निधी कसा मिळणार, याचे उत्तरही राजन तेली यांनी दिले आहे. त्यामुळे राजकारण न करता कणकवली शहराचा आम्ही विकास करू.

राणेंच्या बंगल्याला आग कोणी घातली?

भाजपचे कणकवलीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांचे विषयी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राजन तेली म्हणाले, नारायण राणेंच्या बंगल्याला आग घातली तेव्हा आरोपी कोण होते? नंतर ते नगराध्यक्षही झाले. नलावडे यांनी निलेश राणेंविषयी काही वक्तव्य केले असेल त्याला आमचे स्थानिक पदाधिकारी उत्तर देतील. निलेश राणे आणि नितेश राणे दोघेही आपापल्या पक्षांच्या भूमिकेनुसार काम करत आहेत. अगदी त्याच पद्धतीने समीर नलावडे व संदेश पारकर हे आपल्या पक्षाच्या, आघाडीच्या भूमिकेनुसार काम करत आहेत यात कुणामध्येही वैयक्तिक वाद नाहीत, असेही राजन तेली यांनी स्पष्ट केले.

युती तुटली त्याला भाजपच जबाबदार

आम्ही युती तोडली नव्हती. पण भाजपवाल्यांनी मालवणला पत्रकार परिषद घेऊन अधिक जागांची मागणी केली. वास्तविक कणकवलीत आम्हाला मोठी अपेक्षा नव्हती. नारायण राणेंनी युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. तर शिंदे शिवसेनेतर्फे आमचे उपनेते संजय आंग्रे व सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील पालकमंत्री नितेश राणे व भाजपच्या मंडळींची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव दिला होता. पण या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली गेली व भाजपवाले स्वबळाची भाषा करत राहिले.

युती संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पालकमंत्री नितेश राणे काय बोलले आहेत, हे तुम्हीच बघा. अखेरीस त्यानंतर निलेश राणे यांनी या विषयावर भाष्य केले. वास्तविक आम्ही खासदार नारायण राणे यांच्या ‘युती व्हावी’ अशा सूचनेचे पालन करत होतो. त्याच कारणास्तव आम्हाला कणकवलीच्या निवडणुकीत उतरायला वेळ लागला व आम्ही अखेरीस शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे निलेश राणेंना टार्गेट करणार असाल तर आम्ही ऐकणार नाही, असा इशाराही तेली यांनी दिला.

कणकवलीची निवडणूक विकासासाठी निलेश राणेंचे अतिरिक्त संरक्षण काढून घ्यावे, या माजी आमदार वैभव नाईक यांच्या मागणीविषयी बोलताना राजन तेली म्हणाले, वास्तविक वैभव नाईक यांनी याविषयी आपली तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो प्रश्न आता राहिलेला नाही. तर शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांनी मालवण मध्ये युती का केली नाही, या पालकमंत्री नितेश राणे यांच्या विधानावर बोलताना सतीश सावंत म्हणाले, कणकवलीची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून त्यासाठीच सर्व पक्ष एकत्र आलो आहोत. वैभव नाईक यांनी मालवणमध्ये काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे.

You cannot copy content of this page