दांडी येथून भाजप उमेदवारांच्या प्रचाराला शुभारंभ…

⚡मालवण ता.२०-:
बा देवा दांडेश्वरा म्हाराजा… आज भाजपच्या कमळच्या निशाणीवर जे तीन उमेदवार उभे आसत तेंका भरघोस मतांनी विजयी कर रे म्हाराजा… असे साकडे घालत आज मालवण शहरातील दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिरातून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. अन्वेषा आचरेकर आणि श्री. सन्मेष परब यांनी दांडी प्रभागातील प्रचारास प्रारंभ केला. यावेळी तिन्ही उमेदवारांनी दांडी किनारपट्टी भागात प्रचार फेरी काढतानाच घरोघरी भेटी देऊन प्रचार केला.

यावेळी भाजपचे मंदार केणी, यतीन खोत, किशोर खानोलकर, अजित आचरेकर, श्री. तोडणकर आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत म्हणाल्या, दांडी भागातील प्रचारात भाजपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे याच्या मार्गदर्शनाखाली भाजपची घोडदौड सुरु आहे. मालवण शहराच्या किनारपट्टी भागातील मच्छिमार व जलपर्यटन व्यावसायिकांचे विविध प्रश्न राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडविले जात आहेत. किनारपट्टीच्या विकासाबाबत ना. नितेश राणे यांची दूरदृष्टी आहे. मालवणच्या किनारपट्टीवर बंधारा कम रस्ता बांधण्याच्या दृष्टीने मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत. यामध्ये खाऊगल्ली सारखी संकल्पना असून त्यामध्ये स्थानिक बचत गटांच्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. किनारपट्टीवरील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी हा भाजपच आणू शकतो असा विश्वास सौ खोत यांनी व्यक्त केला

यावेळी सौ. अन्वेषा आचरेकर म्हणाल्या, आज श्री देव दांडेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून प्रचाराला सुरुवात केली आहे. दांडी भागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन बंदर व मत्स्य विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे. दांडी भागासाठी ना. नितेश राणे याच्याकडे फार मोठे व्हिजन आहे. दांडीसह किनारपट्टीवरील जलपर्यटनाला कायदेशीर परवानगी नसल्याने त्यास कायदेशीर दर्जा प्राप्त करून देणे आणि जलपर्यटन व्यवसयिकांना परवाने मिळवून देण्यासाठी मंत्री राणे प्रयत्नशील आहेत. तसेच दांडी किनारपट्टीवरील अपूर्ण राहिलेला बंधारा कम रस्ता पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. दांडी हे व्यवसायाचे मोठे स्थान बनत आहे. याठिकाणी खाऊ गल्ली निर्माण करून त्यामध्ये बचत गटाच्या महिलांचे स्टॉल उभारून त्यांना रोजगाराची संधी दिली जाणार आहे. तसेच कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या किनारपट्टीवरील तरुणांना येथेच काम उपलबज करून देण्यासाठी देखील मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत. मच्छिमारांचे प्रश्नही मत्स्य मंत्री नितेश राणे सोडवत असून मासेमारीला कृषीचा दर्जा त्यांनी मिळवून दिला आहे. मच्छिमारी जाळ्यांसाठी त्यांनी अनुदान मिळवून दिले आहे. खासदार नारायण राणे हे सुद्धा किनारपट्टीवरील लोकांच्या सोबत असून येथील विकासासाठी आवश्यक निधी भाजपचे देईल, असेही सौ. आचरेकर म्हणाल्या.

You cannot copy content of this page