⚡सावंतवाडी ता.१७-: मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अनुराधा सिताराम सुर्वे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा कृतज्ञता सोहळा शाळेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
आठ वर्षांच्या कार्यकाळात सुर्वे यांनी शाळेला जिल्हास्तरीय यश, आधुनिक सुविधा आणि आदर्श शाळेचा मान मिळवून दिला.
शाळेच्या सभागृहात हा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन व सरस्वती मातेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, सीताराम सुर्वे, शाळेच्या शिक्षिका सीमा सावंत, अस्मिता गोवेकर, सिद्धी कुडव, विजय ठाकूर, तेली, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री व सौ सुर्वे दांपत्याचा शाल व साडी श्रीफळने ओटी भरून औक्षण करण्यात आले. तसेच शाळेस दिलेल्या सेवेबद्दल शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, फॅन व फ़ोटो फ्रेम भेट देऊन सुर्वे यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
सुर्वे यांनी तब्बल ८ वर्षे ६ महिने मुख्याध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या नेतृत्वात शाळेने सर्व स्पर्धा परीक्षा, क्रीडा, नृत्य, समूहगीत आदी विविध स्पर्धांमध्ये जिल्हा स्तरावर अनेक पारितोषिके मिळवली. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमातही शाळेला त्यांच्याच कार्यकाळात मानाचा पुरस्कार मिळाला. शाळेला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक संघ आणि राधारंग फाऊंडेशन यांनी ‘आदर्श शाळा पुरस्कार’ देऊन गौरविले. त्यांच्या काळात शाळा सर्व भौतिक सुविधांनी समृद्ध बनली. सुंदर गार्डन, स्वच्छ परिसर, सुबक रंगकाम, क्रीडांगण, सिसिटीव्ही, डिजिटल वर्ग, आधुनिक संगणक कक्ष, बाल वाचनालय अशा सुविधा निर्माण करून त्यांनी शाळेला खऱ्या अर्थाने ‘नंदनवन’ बनवले. सध्या त्यांची बदली माजगाव कासारवाडी शाळेत झाली आहे. यावेळी सुर्वे यांनी जिल्हा परिषदेच्या सावित्रीबाई फुले दत्तक योजना अंतर्गत शाळेतील दोन मुलींना दत्तक घेण्यासाठी देणगी शाळेच्या उपशिक्षिका सावंत यांच्याकडे सुपूर्द केली. सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. .
शारदा विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न…
