संदेश पारकर:विकासाचा शोध घेण्याची वेळ आली,शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात..
⚡कणकवली ता.१५-: गेल्या आठ वर्षांत कणकवली शहरासाठी तब्बल ४०० कोटींचा निधी आला, पण या पैशात झालेले काम दुर्बिण लावली तरी दिसत नाही. एवढा प्रचंड निधी नेमका कुणाच्या विकासासाठी आला हे कणकवलीकरांना चांगलेच माहिती आहे, अशी ठणकावलेली टीका शहरविकास आघाडीवै नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केली.
कणकवली येथे आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मागील आठ वर्षांतील नगरपंचायतीच्या कारभारावर जोरदार प्रहार केला.
पारकर म्हणाले,
४०० कोटी खर्च झाले, पण शहरात आजही मूलभूत सुविधा उभ्या राहिलेल्या नाहीत. रस्ते, गटारे, ड्रेनेज, पाणीपुरवठा… कोणतेच काम समाधानकारक दिसत नाही. शहराचा विकास थांबला आणि मोजक्याच लोकांचा विकास झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भ्रष्टाचारावर बोलायलाही भीती… हे चित्र मी बदलणार
कणकवलीतील सद्य परिस्थितीवर बोलताना पारकर म्हणाले की, आज शहरात सत्ताधाऱ्यांविरोधात खुलेपणे बोलणे कठीण झाले आहे.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलायचे झाले तरी लोक दबक्या आवाजात बोलतात. नगरपंचायतीत काम करून घेण्यासाठी दादागिरी सहन करावी लागते. त्यांचा पक्ष असेल तरच कामे केली जातात, अन्यथा नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाते, अशी टीका त्यांनी केली.
स्वाभिमानी कणकवलीकर घडविणे माझे ध्येय
पारकर पुढे म्हणाले,
हे चित्र मला बदलायचे आहे. प्रत्येक कणकवलीकर ताठ मानेने उभा राहून शहरविकासाच्या मुद्द्यांवर बोलू शकला पाहिजे. स्वाभिमानी कणकवलीकर निर्माण करण्यासाठी आणि शहराला लागलेला भ्रष्टाचाराचा विळखा तोडण्यासाठी मी नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरत आहे.
