*💫कणकवली दि.११-:* रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश सदाशिव पवार यांच्या ‘मी कवी थातूरमातूर’ या पहिल्या इ बुक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आज श्रीमती शुभांगी सदाशिव पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. हा काव्यसंग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर, आजोबा कै. लक्ष्मण साबाजी पवार आणि श्रीकृष्ण याना कवी डॉ.सतीश पवार यांनी अर्पण केलेला आहे. या काव्यसंग्रहात एकूण 135 कविता आहेत. पेशाने वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. सतीश पवार यांनी आपल्या सभोवताली आले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. खेड्यापाड्यातील जीवन जगताना घडणाऱ्या गमतीजमतीसह काही विदारक वास्तव चपखलपणे ओघवत्या शब्दात व्यक्त केले आहेत.शब्दागणिक मानवी संवेदनांचा फार मोठा आवाका कवेत घेणाऱ्या कविता या काव्यसंग्रहात आहेत. डॉ सतीश पवार यांची कविता वाचल्यानंतर स्वार्थाच्या भाऊगर्दीत माणूसपणाचे खणखणीत अस्सल वाण जिवंत ठेवणारी कविता असल्याचे जाणवते. काव्यसंग्रहाला प्रस्तावना वैशाली पंडित , मालवण यांनी लिहिली असून डॉ भा. वा. आठवले, डॉ विवेक रेडकर, डॉ प्रफुल्ल आंबेरकर, डॉ विजय पोकळे, डॉ विनय शिरोडकर , डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. काव्यसंग्रह इबुक स्वरूपात असून मोफत उपलब्ध आहे. काव्यसंग्रह epub, pdf, word आणि मोबी फॉरमॅट मध्ये असून मोबईलसाठी प्ले बुक्स हे अँप वापरून epub वापरून हा काव्यसंग्रह वाचता येईल. प्रा.अमर पवार यांनी या काव्यसंग्रहाचे डीजायनिंग व अक्षर जुळणी केली आहे. मुखपृष्ठ चिन्मय सरमळकर आणि निंतांत चव्हाण यांनी तयार केले आहे. काव्यसंग्रहासाठीसाठी मान्यवर कवी, गझलकार मधुसूदन नानिवडेकर आणि सरिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले असून डॉ धनंजय रासम, शैलेश घाडी, मीनाक्षी चव्हाण, मनाली राणे, ओंकार तेली, अदिती केदारे, माधवी चव्हाण यांनी परिश्रम घेतले. डॉ पवार हे कणकवलीतील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट आहेत. ‘कविता हा माझा छंद असून माझी एखादी कविता वाचकांना आवडली तर तोच माझा पुरस्कार.’ असे उद्गार डॉ पवार यांनी काव्यसंग्रह प्रकाशनवेळी काढले.
*डॉ. सतिश पवार यांच्या ‘मी कवी थातूरमातूर ‘ च्या ई बुक काव्यसंग्रहाचे प्रकाशन*
