जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:तर येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत विरोधी पक्षांना एक टक्काही फायदा होणार नाही..
ओरोस ता १४
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाने जोरदार यश मिळविल्याने जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांत उत्साह वाढला आहे. भाजप शतप्रतिशत होतानाच राष्ट्र, राज्य विकसित करण्याच्या संकल्पाला ताकद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालावर व्यक्त केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा कल जाहीर होऊ लागल्यानंतर शुक्रवारी दुपारी श्री सावंत यांनी सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सोबत जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधानाचा विषय आणला. तरीही देशात भाजपचे सरकार आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्यासह तीन चार राज्यांच्या निवडणुका झाल्या. तेथेही भाजपने सत्ता मिळविली. त्यानंतर बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. यावेळी विरोधकांनी वोट चोरीचा मुद्दा आणला. तरीही येथे भाजप मित्र पक्षांना स्पष्ट बहुमत मिळत आहे.
ज्या निवडणुकीत भाजपला यश मिळणार असे वाटत असते त्यावेळी विरोधक सत्य नसलेले मुद्दे काढतात. निगेटिव्ह नेरेटीव्ह तयार करतात.त्याप्रमाणे बिहार निवडणुकीत वोट चोरीचा मुद्दा काढला गेला. त्यामुळे बिहार निवडणूक चर्चेत आली. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनर र्नरिक्षण केले. याद्या अद्यावत केल्या. मात्र, त्याचा निकालावर भाजपच्या दुष्टीने काहीही दुष्परिणाम झाला नाही. उलट येथे विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही. २०२० मध्ये जेडीयू, भाजप आणि एलजेपी या तीन पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापन केली होती. त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे जनतेने पुन्हा याच पक्षांना संधी दिली आहे. येथील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना साथ देत काँग्रेसची स्पर्धा अपक्ष निवडून आणलेल्या आमदारांशी ठेवली आहे, असेही यावेळी सावंत यांनी सांगितले.
चौकट
विनोद तावडे यांच्या नेतृत्वात मिळाला विजय
याबाबत सिंधुदुर्ग भाजपच्यावतीने पंतप्रधान मोदी, अमित शहा, जे पी नड्डा, नितीशकुमार यांचे अभिनंदन करीत आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सिंधुदुर्ग पुत्र विनोद तावडे निवडणूक प्रभारी होते. त्यामुळे या यशात त्यांचे मोठे योगदान आहे. यापूर्वी त्यांनी हरियाणा राज्यात सुद्धा प्रभारी म्हणून काम करताना विजय मिळवून दिला होता. त्यामुळे तावडे यांचेही सिंधुदुर्ग भाजप खास अभिनंदन करीत आहे.
चौकट
भाजप पक्षाची प्रत्येक निवडणुकीत वेगळी रणनीती असते. त्यामुळे या निवडणुकीत कोणती रणनीती असेल ? याबाबत वरिष्ठ स्पष्ट करतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती असेल की नाही ? याचा निर्णयही तेच घेणार आहेत. आम्ही एक नगरपंचायत आणि तिन्ही परिषदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्याची यादी आमचे म्हणणे मांडून वरिष्ठांना पाठविली आहे. त्यामुळे उमेदवारी वरिष्ठ निश्चित करून जाहीर करतील. आमच्यात महायुती झाली किंवा नाही तरी यामुळे विरोधी पक्षांचा एक टक्काही फायदा होणार नाही, यांची काळजी आम्ही घेणार आहोत, असेही यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.
फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी: पत्रकार परिषदेत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सोबत सरचिटणीस रणजीत देसाई
