शून्यातून विश्व निर्माण करू…

दत्ता सामंत: निलेश राणेंना मालवण शहराला राज्यात अव्वल दर्जाचे शहर बनवायच आहे..

मालवण, दि प्रतिनिधी

मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना म्हणून लढण्यास सज्ज आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारची घमेंड नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमचे अस्तित्व काय आहे हे दाखवून देताना मतदार राजाच्या आशीर्वादाने शून्यातून विश्व निर्माण करू असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आमदार निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जे उमेदवार असतील ते प्रचाराला सुरवात करण्यापूर्वी शहराचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरात पालिकेचा कारभार पारदर्शकरित्या करण्यासाठी शपथ घेतील. त्यामुळे जे कोण आम्ही शुन्य आहोत असे सांगत आहेत त्यांना त्याचे उत्तर ३ डिसेंबरला दिसून येईल असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

मालवण येथील महायुतीच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मच्छीमार सेल जिल्हाप्रमुख राजा गावकर, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहर प्रमुख दीपक पाटकर, ममता वराडकर, तालुका संपर्कप्रमुख राजेश गावकर, वसंत गावकर, उप तालुका प्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, राजन परुळेकर, माजी नगरसेवक जगदीश गावकर, मोहन वराडकर, शेखर गाड, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, यशवंत गावकर, जाबीर खान, संदीप मालंडकर, विनायक रेडकर, चंदू आचरेकर, प्रसाद आडवणकर, शिवाजी केळुसकर, मंदार लुडबे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सामंत यांनी महायुती होण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. तसेच आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचला. आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोत. केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. खासदार नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे या सर्वांनी महायुती म्हणून लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या नगरपालिकेच्या निवडणुकीतही महायुतीने एकत्र येऊन लढावे अशी आमची सर्वांची मनापासूनची इच्छा आहे. काही मंडळींकडून महायुतीबाबत शंका व्यक्त होत असली तरी आम्ही शून्यातून किती विश्व निर्माण करू शकतो हे त्यांना निकालाच्या दिवशी पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार निलेश राणे यांनी निवडून आल्यानंतर मालवण शहरासाठी भरीव निधी आणल्याचे त्यांनी सांगितले. यात अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी २ कोटी रुपये, नळपाणी योजनेसाठी ४६ कोटी रुपये, जिल्हा नियोजनमधून नगरोत्थान अंतर्गत १.३५ कोटी रुपये, क्रीडांगण संकुलासाठी ४ कोटी रुपये, शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटी रुपये उपलब्ध करून दिले. कचरा प्रश्नाचे निलेश राणे यांनी व्यवस्थित नियोजन केल्यामुळेच मालवण नगरपालिकेला १ कोटीचे बक्षीस मिळाले. या मतदार संघाला निलेश राणे यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व लाभले आहे. मतदार संघाच्या शहराच्या विकासासाठी ते भांडून विकास निधी उपलब्ध करून आणत आहेत. त्यामुळे निलेश राणे या ब्रँडवरती या शहरांमध्ये १५-२० टक्के मतदान केवळ एक अभ्यासपूर्वक काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून वाढले आहे. श्री. राणे हे किमान १५ दिवसांतून दोन-तीन वेळा नगरपालिकेला भेट देत असून सातत्याने शहराच्या नियोजनाचा आणि कामांचा आढावा घेत आहेत. ज्यामुळे चुकीचे नियोजन होणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे.
मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र ती न झाल्यास शिवसेनेचे जे उमेदवार निवडून येतील. ते प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी श्री देव रामेश्वर मंदिरात मी निवडून आल्यानंतर शहरामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराचा पैसा घेणार नाही. कुठल्या कॉन्ट्रॅक्टर/बिल्डरकडे चुकीचे पैसे मागणार नाही. नागरिकांना त्रास देणार नाही. मी जनतेचा सेवक म्हणून पाच वर्ष पारदर्शक काम करीन अशी शपथ घेतील असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका हा धंदा नाही ते समाज मंदिर आहे. आपण या समाजमंदिरात साहेब होऊन जात नाहीत, तर सेवक म्हणून जातो असे म्हणत त्यांनी समाजकारण आणि सेवाभावी वृत्तीला महत्त्व दिले. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हे आमचे घोषवाक्य आहे. त्यामुळे आम्ही समाजकारणातूनच काम करतो. त्यामुळे अहंकाराची भाषा कोणी करू नये असा सल्ला श्री. सामंत यांनी देत मतदाराला राजा मानण्याचे आवाहन केले.
निलेश राणेंना मालवण शहराला राज्यात अव्वल दर्जाचे शहर बनवायचे आहे. यासाठी विद्यमान उपमुख्यमंत्री, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे जनतेने आम्हाला सत्ता दिली तर आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक पुढील पाच वर्षे पारदर्शक कारभार करतील असा विश्वासही श्री. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page