⚡बांदा ता.१३-: “आपल्या इतिहासातील दुर्ग म्हणजे केवळ दगडी बांधकाम नसून ते स्वातंत्र्य, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. किल्ले स्पर्धांमुळे नव्या पिढीत इतिहासाची गोडी निर्माण होते व संस्कारांचा वारसा पुढे जातो.” स्पर्धकांनी भविष्यातही अशा उपक्रमात सहभागी होऊन या वारसा जपावा असे आवाहन प्रकाश पाणदरे यांनी येथे केले.
बांदा येथील ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने आयोजित किल्ले स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात श्री पाणदरे बोलत होते. येथील श्रीराम चौकात सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी ऐतिहासिक किल्ल्यांचे उत्कृष्ट नमुने साकारले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नाना शिरोडकर उपस्थित होते.
यावेळी किल्ले स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते चैतन्य वराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेला सुवर्णदुर्ग, द्वितीय क्रमांक दर्पण देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेला लोहगड, तृतीय क्रमांक सान्वी नाईक व इतरांनी साकारलेला जंजिरा किल्ला, उत्तेजनार्थ पारितोषिक कौस्तुभ राणे व अन्य विशाळगड पन्हाळा, गौरांग कानसे रायगड तसेच विशेष पारितोषिक म्हणून देवांश साळगावकर व वेदांत चौगुले यांच्यासह पर्यावरणपूरक आकाश कंदील स्पर्धेतील विजेता नैतिक मोरजकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अन्वर खान, सचिव गुरुनाथ नार्वेकर, उपाध्यक्ष हनुमंत सावंत, भिकाजी धुरी, सुभाष नाईक, महादेव वसकर, जगन्नाथ सातोसकर, नागेश सावंत, एम डी मोरबाळे, शंकर नार्वेकर, अशोक परब, यशवंत सावंत, हरिश्चंद्र भिसे, श्री बांदेकर, निकिता मोरजकर, अर्चना सावंत आदिसह कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे ज्येष्ठ नागरिक विचार मंच यांच्यावतीने आयोजित किल्ले आकाश कंदील स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)
ज्येष्ठ नागरिक विकास मंचतर्फे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न…
