ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासात सोडावे…

ग्रामस्थांची मागणी: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तातडीने देण्याची केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी तालुक्यातील बांदा, इन्सुली, वाफोली परिसरात गेले दोन महिने ठाण मांडून बसलेल्या वन्य प्राणी ॐकार हत्तीला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसंदर्भात दशक्रोशीतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी ,महसूल सावंतवाडी यांच्याकडे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कास, मडुरा, सातोसे, रोणापाल, इन्सुली, तांबोळी, भालावल, वाफोली, सरंबळे आदी भागात हा हत्ती वारंवार दिसत आहे. दरम्यान, काही ठिकाणी वन कर्मचारी व पोलिस कर्मचारी त्याच्यावर सुतळी बॉम्ब व लाठीचार्ज करत असल्याने हा हत्ती अधिक बिथरला असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान झाले असून, त्यांची नुकसान भरपाई तातडीने अदा करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रती हेक्टरी ८ हजार रुपये तर गोवा राज्याने प्रती हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई दिल्याचा उल्लेख करून, या तफावतीबाबत शासनाने गंभीरतेने विचार करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी श्री. सुरेश गावडे (माजी सरपंच, रोणापाल), श्री. प्रविण पंडित (सरपंच, कास), श्री. गुरुदास गवंडे (माजी उपसरपंच, निगुडे), श्री. उल्हास परब (माजी उपसरपंच, मडुरा), श्री. प्रकाश वालावलकर (माजी ग्रा.पं. सदस्य, मडुरा) यांच्या स्वाक्षऱ्या असून, सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक वनविभाग, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांना देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page