⚡बांदा ता.०९-: ओंकार हत्तीवर दांडा मारणाऱ्या तसेच त्याच्या अंगावर सुतळी बॉम्ब टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी यासाठी वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस हे उद्या (सोमवार) दिनांक ९ रोजी सकाळी 10 वाजता येथील श्रीराम चौकात आमरण उपोषणाला बसणार आहेत. याबाबत त्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षक तसेच बांदा पोलीस ठाणे यांना निवेदन सादर केले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या संदर्भात वन्य हत्ती ‘ओंकार’वर लाफा मारणाऱ्या अज्ञात इसमावर तसेच दांडा मारणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी.
शांतपणे मार्गक्रमण करणाऱ्या वन्य हत्ती ओंकारच्या पार्श्वभागावर एका निर्लज्ज इसमाने लाफा मारल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ही कृती केवळ कायद्याचा भंग नसून संपूर्ण मानवतेचा व वन्यजीव संरक्षणाच्या तत्त्वांचा अपमान असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या घटनेच्या वेळी घटनास्थळी पोलीस व वनविभागाचे अधिकारी उपस्थित असूनही कोणतीही तात्काळ कारवाई झाली नाही, हे अत्यंत गंभीर असल्याचे गवस यांनी म्हटले आहे. या अधिकाऱ्यांची ही निष्काळजी वृत्ती सार्वजनिक सुरक्षेसाठी धोकादायक आहे.
“ओंकार हा शांत स्वभावाचा वन्य हत्ती असून त्याला उद्दामपणे लाफा मारणे ही उचकवणारी कृती होती. या घटनेमुळे उपस्थित नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे संबंधित इसमावर गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या पोलिस व वनकर्मचारी यांच्यावरही कारवाई व्हावी.” जर या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई झाली नाही, तर बांदा येथील श्रीराम चौकात आमरण उपोषणास बसणार आहेत.
या निवेदनामुळे स्थानिक प्रशासन आणि वनविभागावर कारवाईची मागणी तीव्र होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात नागरिकांच्याही भावना तीव्र झाल्या असून, वन्यजीव संरक्षणाबाबत प्रशासनाच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
फोटो:-
बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांना निवेदन देताना गुणेश गवस.
