खासदार नारायण राणे:
कणकवलीत पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका;विशाल परब, राजन तेलींना मी मानत नाही..
कणकवली ता.०८-: सिंधुदुर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष, शिंदे गटाची शिवसेना आणि महायुती एकत्र येऊन लढणार असल्याचे जाहीर वक्तव्य केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्गात भाजप–शिंदे सेना आमनेसामने येणार, अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. “भाजपा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असून, महायुतीतूनच निवडणुका लढाव्यात, याच मताचा मी आहे,” असे राणे म्हणाले. येत्या दोन दिवसांत या निर्णयावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी विशाल परब यांच्यावरही थेट निशाणा साधला. “विशाल परबला मी किंमत देत नाही. तो कोठेही भेटला तरी भेटू दे, त्याच्या ऑफिसमध्येही भेटला तरी मीडियाला ब्रेकिंग मिळेल. मग वाचवायला कोणीही येऊ दे,” असे म्हणत राणे यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. “विशालने भाजपावर कमी टीका केलेली नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना आणि ठाकरे सेना युतीतून ‘शहर विकास आघाडी’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याबाबत विचारले असता, राणे म्हणाले, “असे झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात भाजपा शिंदे सेनेशी संबंध तोडेल.” माजी आमदार राजन तेली यांच्या पुढाकाराने ही आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र राणे यांच्या या इशाऱ्याने ही संभाव्य आघाडी सुरु होण्यापूर्वीच कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या राजकारणावर बोलताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. आता सरकारवर टीका करत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे हे आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बोलत आहेत. मुंबई महानगरपालिकेत इतकी वर्षे सत्ता असूनही आता प्रचार करावा लागत आहे. मुंबईची त्यांनी वाताहात लावली. राज्यात महायुती सरकारमध्ये विघ्न आणणे आणि स्वतःचे अस्तित्व जपणे, एवढेच काम हे दोघे करत आहेत.”
या पत्रकार परिषदेला जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, संचालक महेश सारंग आदी मान्यवर उपस्थित होते.
