कळसुली-गडगेवाडी येथे धाडसी घरफोडी…

२० तोळे सोने, चांदीचे दागिने आणि ३ लाखांची रोकड लंपास..

कणकवली : कळसुली-गडगेवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी तब्बल २० तोळे सोने, काही चांदीचे दागिने आणि सुमारे तीन लाख रुपये रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कळसुली-गडगेवाडी येथील रहिवासी विनायक दळवी हे आपल्या कुटुंबासह मंगळवारी दुपारी भात कापणीच्या कामासाठी शेतात गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा फोडून घरात प्रवेश करत कपाटातील ऐवज चोरीस नेला.

दळवी कुटुंब दुपारी घरी परतल्यानंतर घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा दिसल्याने संशय आला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत फेकलेले दिसले. तपासणीअंती अंदाजे २० तोळे सोने, काही चांदीचे दागिने आणि सुमारे तीन लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये आणि पोलिस पाटील सारिका कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. सध्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page