दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार्य करणार…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे:उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी व युडीआयडी कार्ड शिबिर..

कणकवली : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांच्याकडे युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे, असे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले. कणकवली तालुक्यातील ज्यांच्याकडे हे कार्ड नाही, अशा दिव्यांग बांधवांसाठी उपजिल्हा रुग्णालयात विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारचे सहकार्य किंवा मदत हवी असल्यास महसूल प्रशासनाकडून ती निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही देशपांडे यांनी दिली.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या या कॅम्पचे उद्घाटन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, सचिव सचिन सादये, सभासद अशोक पाडावे, संगीता पाटील, यल्लाप्पा कट्टीमनी, डॉ. बाळासाहेब जोशी, डॉ. धनंजय रासम, डॉ. सचिन डोंगरे, व्ही. यू. शिगनाथ, महसूल सहाय्यक गौरी पाटील, शुभम दळवी आदींसह रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

पूर्वी दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड काढण्यासाठी ओरोस येथे जिल्हा मुख्यालयात जावे लागत होते. त्यामुळे अनेकांना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे तालुकास्तरावर कॅम्प घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असे कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

कणकवलीतील कॅम्प यशस्वी होण्यासाठी शासकीय यंत्रणांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल तहसीलदार देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच युडीआयडी कार्ड मिळाल्यानंतर संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दिव्यांग बांधवांना तालुकास्तरावरच युडीआयडी कार्ड सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संगीता पाटील यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानसी नकाशे यांनी केले. दरम्यान, कॅम्प अंतर्गत दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते.

You cannot copy content of this page