बांदा आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपासाची सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांची मागणी…

“कोणाच्याही दबावाला बळी न पडता तपास करा; अन्यथा आंदोलन होईल”;सकल हिंदू समाजाचा इशारा..

⚡सावंतवाडी ता.०३-:
बांद्यात घडलेल्या आत्महत्या प्रकरणाने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचा कोणाच्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक आणि सखोल तपास व्हावा, अशी ठाम मागणी सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केली आहे.
त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की

“या प्रकरणात कोणीही राजकीय, धार्मिक किंवा स्थानिक दबाव आणून निरपराध व्यक्तींना फसविण्याचा प्रयत्न केला, तर सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरेल आणि आंदोलनात्मक भूमिका घेईल. अशावेळी निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील.”

“खरे कारण काय?” — आत्महत्येतील गूढ वाढले
या आत्महत्या प्रकरणामागे नेमके कारण काय आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित युवकाने आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ, त्यातील विधानं आणि त्याच्या व्यवसायाशी संबंधित बाबींचा सखोल तपास आवश्यक आहे, असेही गावडे यांनी नमूद केले.

“त्या युवकाचा व्यवसाय कोणत्या कारणाने बंद करण्यात आला होता? तो किती महिन्यांपासून बंद होता? आणि आता अचानकच त्याने मृत्यूपूर्वी व्हिडिओ करून आत्महत्या का केली — हे सर्व तपासले गेले पाहिजे,”
असे त्यांनी सांगितले
तयाचबरोबर, त्या व्हिडिओत उल्लेख केलेल्या व्यक्तींनी त्याला नेमका कोणता त्रास दिला, आणि बांद्यातील इतर कोणालाही न देता त्यालाच का लक्ष्य केले गेले, याचाही तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“दोडामार्गप्रमाणे अन्याय होऊ देणार नाही”
सकल हिंदू समाजाने प्रशासनाला स्मरण करून दिले की, दोडामार्ग येथील वाहन जाळपोळ प्रकरणातही अनेक निरपराध हिंदू बांधवांची नावे चुकीने घालण्यात आली होती, आणि त्यांनाही नाहक गुंतविण्यात आले होते.
“बांद्यातही तसाच प्रकार घडू लागला आहे. कोणत्याही तरुणाला नाहक फसवले गेले, तर हिंदू समाज गप्प बसणार नाही,”

असा स्पष्ट इशारा जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिला आहे.

सकल हिंदू समाजाची भूमिका ठाम
या प्रकरणातील प्रत्येक व्हिडिओ, ऑडिओ, पुरावा आणि साक्ष तपासूनच पुढील कार्यवाही व्हावी, अशी मागणी करून गावडे यांनी सांगितले की,

“सत्य उघड व्हावं, यासाठी आम्ही ठाम आहोत. पण निरपराध हिंदू तरुणांना अडकवण्याचा डाव आम्ही हाणून पाडू.”
एकंदरीत, बांदा आत्महत्या प्रकरणाला आता केवळ भावनिक नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक आयाम प्राप्त झाला आहे. पोलिसांनी सखोल तपास करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशीच जिल्ह्यातील हिंदू समाजाची एकमुखी मागणी आहे.

You cannot copy content of this page