सहा महिन्यांनंतर ओवळीये गावाकडे एस.टी. बससेवा पुन्हा सुरू होणार…

ग्रामस्थांच्या निवेदनाला तत्काळ प्रतिसाद; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाहणीनंतर एस.टी. महामंडळाची हिरवा कंदिल..

⚡सावंतवाडी ता.२९-: ओवळीये गावाकडे जाणारी एस.टी. बससेवा गेले सहा महिने पुलाचे काम चालू असल्यामुळे बंद होती. यामुळे शालेय विद्यार्थी, भाजीपाला घेऊन सावंतवाडी येथे येणारे छोटे-मोठे भाजी विक्रेते तसेच प्रवाशांचे मोठे हाल होत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुमारे २०० ग्रामस्थांच्या सह्याचे निवेदन एस.टी. महामंडळाचे आगार व्यवस्थापक श्री. निलेश गावीत , तसेच सार्वजनिक बांधकाम (सा. बां.) उपविभागाचे उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांना देण्यात आले.

​निवेदन मिळताच सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेतली. उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांच्या आदेशानुसार शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदर रस्त्याची व पुलाची पाहणी करून रस्ता एस.टी. वाहतुकीसाठी योग्य असल्याचा अहवाल तातडीने एस.टी. महामंडळाला पत्र देऊन कळवला.

​सा. बां. विभागाने हिरवा कंदिल दाखवल्यामुळे ओवळीये गावात एस.टी. बस जाण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे, त्यामुळे लवकरच ही बससेवा पूर्ववत होईल. या जलद कारवाईबद्दल विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, ओवळीये गावचे प्रमुख मानकरी सदानंद सावंत, ग्रा.पं. सदस्य सुप्रिया राऊळ, मोहन गवस (निवृत्त शिक्षक), सुदाम सावंत, श्रीमती सावंत, सुलोचना गवस, प्रिया गवस, नंदा सावंत, कोमल दळवी, दिपाली राऊळ, राजश्री सावंत, कल्याणी सावंत वगैरे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page