सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश…

येत्या बुधवारी संपूर्ण शहर होणार खड्डेमुक्त: रवी जाधव यांची माहिती..

⚡सावंतवाडी ता.१३-:
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून येत्या बुधवारी संपूर्ण सावंतवाडी शहर ‘खड्डेमुक्त’ करण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना दूरध्वनीद्वारे दिली.

गेल्या तीन वर्षांपासून सावंतवाडी शहरात आणि परिसरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत होते. या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःच्या खर्चाने मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरील खड्डे बुजवले होते.

तसेच शहरातील सुमारे ७० गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्यांचे रंगकाम करून वाहतुकीची सुरक्षितता वाढविण्यात आली होती.

तथापि, सर्वच खड्डे स्वखर्चात बुजवणे संस्थेला शक्य नसल्याने प्रतिष्ठानने नगरपरिषद, बसस्थानक प्रशासन व बांधकाम विभागाला निवेदन देऊन उर्वरित रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर बसस्थानक परिसरातील तात्पुरते खड्डे बुजवले गेले होते.या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने आता पुढाकार घेत येत्या बुधवारी संपूर्ण सावंतवाडी शहरातील सर्व खड्डे बुजवून ‘खड्डेमुक्त सावंतवाडी शहर’ ही मोहीम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या ठिकाणी अद्याप खड्डे उरले असतील, त्या ठिकाणच्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

या उपक्रमाबद्दल नगरपरिषदेचे अभिनंदन करत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page