पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन..
⚡कणकवली ता.१०-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी तसेच वारसा संवर्धनाचा संदेश देण्यासाठी व्यसनमुक्त गडकिल्ले संवर्धन मोहिमेचा शुभारंभ शनिवारी ११ रोजी सिंधुदुगार्तून होणार आहे.
याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडावर होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक तथा सचिव अमोल मडामे दिली.
गोपुरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. मडामे बोलत होते. यावेळी कोकण विभागीय प्रमुख दीशा कळंबे, जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर उपस्थित होत्या.
नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा नशामुक्त भारत अभियान समिती, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस विभाग, दुर्गा मावळा प्रतिष्ठान आणि सिंधुदुर्ग नशाबंदी मंडळ (महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.
यानंतर राज्यातील प्रत्येक गड-किल्ल्यांवर अशा उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा ऐतिहासिक वारसा असलेला प्रदेश असून येथे असलेल्या गड-किल्ल्यांचे शिवप्रेमी आणि पर्यटकांची नेहमीच आकर्षण असते.
मात्र, काही ठिकाणी नशेच्या पदार्थांचा वापर आणि अस्वच्छतेची समस्या वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्त आणि स्वच्छ गडकिल्ले निर्माण करण्याच्या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात येत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यात नशाबंदी मंडळाच्या माध्यमातून अमलीपदार्थविरोधी जनजागृती राबवली जात आहे. आता जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या चळवळीला नवा वेग देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या शुभारंभ सोहळ्यासाठी शिवप्रेमी, युवक, महिला बचतगट आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे अमोल मडामे यांनी केले आहे.
