⚡सावंतवाडी ता.१०-: समाजात आजही अनेक निराधार वृद्धं व्यक्ती आधाराच्या शोधात भटकताना दिसतात. अशा वेळी आश्रम आणि सामाजिक संस्थांचं कार्य त्यांच्यासाठी दिलासा ठरतं. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकाराने शिरोडा येथील जिव्हाळा सेवाश्रमात अलीकडेच एका निराधार वृद्धाला आश्रय मिळाला आहे.या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक निराधार वृद्धांना आश्रमात सुरक्षित निवास मिळवून देण्यात आला आहे. “अश्रय मिळवून देताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमचेही डोळे पाणावतात,” असे भावूक उद्गार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संस्थापक रवी जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर वृद्ध भालचंद्र शिरोडकर (वय ६५) हे माजगाव येथील पाईप कंपनीत काम करत होते. पत्नीच्या निधनानंतर आणि मुलं नसल्यामुळे ते पूर्णपणे एकाकी झाले. काही काळ त्यांनी आपल्या मित्र सुरेश मांजरेकर यांच्या दुकानात वेळ घालवला, परंतु मांजरेकर यांच्या निधनानंतर त्यांचाही आधार हरपला. वृद्धपकाळामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांचे काम सुटले आणि ते भटकंती करू लागले.अखेरीस त्यांनी मांजरेकर यांच्या मुलीकडे आश्रय मागितला. आपल्या वडिलांच्या मित्र म्हणून तिनेही त्यांना काही काळ घरात ठेवले आणि त्यांच्या इच्छेनुसार आश्रमात दाखल करण्याची जबाबदारी स्वीकारली. सामाजिक कार्यकर्त्या उमा वारंग यांनी ही व्यथा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे पोहोचवली.यानंतर प्रतिष्ठानच्या हेलन निबरे आणि रूपा गौंडर (मुद्राळे) यांनी पुढाकार घेत रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांच्यासह त्या वृद्धाशी भेट घेतली.
वृद्ध शिरोडकर यांची परिस्थिती पाहून सर्वजण हेलावून गेले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना नवीन कपडे देण्यात आले, वैद्यकीय तपासणी करून औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली. अखेरीस काल संध्याकाळी त्यांना कुडाळ पिंगुळी माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात दाखल करण्यात आले.रवी जाधव यांनी सांगितले की, “आजही समाजात असे असंख्य वृद्ध आपल्याचजवळ असूनही परकेपण अनुभवत आहेत. त्यांच्या डोळ्यात आश्रयाची विनंती आणि मनात एकच प्रश्न — म्हातारपणी जगावं की मरावं!”सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या प्रयत्नामुळे एक वृद्ध जीव पुन्हा आधाराला आला असून, संस्थेचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
