प्रगती चव्हाण:महिला नेतृत्व विकास कार्यशाळा तुळस येथे मोठ्या उत्साहात संपन्न..
⚡वेंगुर्ला ता.०९-: महिला केवळ कुटुंबापुरत्या सिमित न राहता गावाच्या व समाजाच्या निर्णयप्रक्रियेत पुढे आल्या पाहिजेत. या शिबिरातून आत्मविश्वास वाढवून भावी महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक नेत्या घडविणे हा आमचा संकल्प आहे. गावोगाव महिला नेतृत्व फुलले तर खरी लोकशाही सक्षम होईल. महिलांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, विकास या क्षेत्रात ठोस भूमिका घेतली पाहिजे. महिलांचे नेतृत्व म्हणजे फक्त राजकारण नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक तोंडवली डी.एड.कॉलेजच्या माजी प्राचार्या प्रगती चव्हाण यांनी केले.
ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वगुणांना नवा आयाम देण्यासाठी व सामाजिक-राजकीय सक्षमीकरणासाठी महिला नेतृत्व विकास कार्यशाळा तुळस येथे मोठ्या उत्साहात पार पडली. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि डॉन बॉस्को संचलित कोकण विकास संस्था, पणजी-गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथील देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई यांच्या कर्मयोगी रामभाऊ तुळसकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. या शिबिरासाठी श्री देवी सातेरी महिला मंडळ तुळस यांचेही सहकार्य लाभले.
या एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपपज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक तोंडवली डी.एड.कॉलेजच्या माजी प्राचार्या प्रगती चव्हाण, कोकण विकास संस्थेच्या रिजनल ऑफिसर साफिया सय्यद, समन्वयक राजेंद्र कांबळे, प्रा.विवेक चव्हाण, सुजाता पडवळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत गटचर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवकथन व खेळाच्या माध्यमातून महिलांना प्रत्यक्ष नेतृत्वाचे धडे देण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे महेश राऊळ, मंगेश सावंत, आबा राऊळ, मनोज आंगणे, हर्षवर्धन तांबोसकर, नाना सावळ, माधव तुळसकर, प्रदीप परूळकर, सचिन गावडे, विधी नाईक, सानिया वराडकर, भक्ती भणगे, निकिता कबरे, जान्हवी सावंत, प्रज्वल परूळकर, रोहित गडेकर आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव डॉ.सचिन परूळकर यांनी केले.
फोटोओळी – विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
