⚡सावंतवाडी ता.०६-: कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांचे विद्यमाने “पाणी वापर संवर्धनावर आधारित नृत्यनाटिका” हा शेतकऱ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम सावंतवाडी येथे ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, मांगिरीश सांस्कृतिक हाॅल, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना पाण्याचा शास्त्रशुद्ध वापर, पाण्याचे संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धती याबाबत मार्गदर्शन करणे हा आहे. “जल हेच जीवन” हा संदेश या नृत्यनाटिकेद्वारे प्रभावीपणे दिला जाणार असून, शेतकऱ्यांना पाणी बचतीच्या विविध उपाययोजनांची ओळख करून देण्यात येणार आहे.
या नृत्यनाटिकेतून ठिबक सिंचन, पर्जन्यजल संधारण, शेततळी निर्मिती, पाणी वापर नियोजन आणि जलसाक्षरता याबाबत प्रत्यक्ष उदाहरणे देऊन जनजागृती केली जाणार आहे. पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून तिचा जपून आणि नियोजनबद्ध वापर केल्यासच शेती अधिक उत्पादनक्षम आणि टिकाऊ राहील, हा संदेश या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागाच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट “पाणी वाचवा – भविष्य घडवा” हे आहे. शेतकरी, युवक आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होऊन पाणी संवर्धन चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
