Headlines

अमली पदार्थ, अवैध धंद्यांविरोधात लेखणीचा एल्गार; ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांना ‘सिंधुदुर्ग रत्न’!

३५ वर्षांच्या समाजाभिमुख पत्रकारितेची दखल; चुकीच्या प्रवृत्तींवर प्रखर लिखाण करणाऱ्या गावडे यांचा सावंतवाडी नागरी कृती समितीतर्फे गौरव

सावंतवाडी : समाजातील वाईट प्रवृत्ती, अमली पदार्थांचे वाढते जाळे आणि अवैध धंद्यांविरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविणारे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक सीताराम गावडे यांना ‘सिंधुदुर्ग रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सावंतवाडी नागरी कृती समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गेल्या ३५ वर्षांपासून समाजाभिमुख पत्रकारिता करताना गावडे यांनी सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. विशेषतः युवा पिढीला विळखा घालणारे अमली पदार्थ, गांजा, चरस तसेच विविध अवैध धंद्यांविरोधात त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने जनजागृती केली. समाजाच्या हितासाठी चुकीच्या प्रवृत्तींवर थेट प्रहार करणाऱ्या त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना ‘सिंधुदुर्ग रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘लेखणी ही केवळ बातमीसाठी नव्हे, तर समाजजागृतीसाठी!’
पत्रकारितेचा उपयोग केवळ घटना मांडण्यासाठी न करता समाजातील गंभीर प्रश्न प्रशासन आणि जनतेसमोर आणण्यासाठी केला पाहिजे, या भूमिकेतून गावडे सातत्याने लिखाण करीत आहेत. अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईच्या भवितव्याबाबत त्यांनी अनेकदा चिंता व्यक्त करत जनजागृतीची भूमिका घेतली आहे.
या पुरस्कारामुळे समाजातील गैरप्रवृत्तींविरोधात निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान झाला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमात गणपती कलाकार, भजनी कलाकार, सजावट कलाकार, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदिप गावडे, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका सौ. दीपाली भालेकर, माजी नगरसेविका सौ. कीर्ती बोंद्रे, माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग, माजी नगरसेवक तानाजी वाडकर, श्रीराम कोटकर, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हितेन नाईक, सावंतवाडी नागरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील पेडणेकर, सेक्रेटरी श्रीपाद सावंत, उपाध्यक्ष ॲड. राजू कासकर, वसंत जाधव सर तसेच मूर्तिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू सावंत आदी उपस्थित होते.
गैरप्रवृत्तींविरोधातील लढ्याला ‘सिंधुदुर्ग रत्न’ची मोहोर
समाजहितासाठी सातत्याने प्रश्न उपस्थित करणाऱ्या आणि अमली पदार्थ व अवैध धंद्यांसारख्या गंभीर विषयांवर निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या सीताराम गावडे यांच्या पत्रकारितेला मिळालेला हा सन्मान म्हणजे समाजजागृतीच्या लढ्याला मिळालेली पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page