⚡सावंतवाडी ता.२६-: येथील राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय व भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागात सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) म्हणून प्रा. डॉ. श्रीनिवास जाधव (एम.एस., पीएच.डी.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता व स्त्रीरुग्णांना स्थानिक पातळीवर तज्ज्ञ उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.

डॉ. श्रीनिवास जाधव यांना प्रसूती व स्त्रीरोग क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. त्यांनी एम.एस.चे उच्च शिक्षण बेंगळुरू (कर्नाटक) येथून, तर पीएच.डी.चे शिक्षण पारुल विद्यापीठ, गुजरात येथून पूर्ण केले आहे. नांदेड जिल्ह्यासह गुजरातमधील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी दीर्घकाळ रुग्णसेवा बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाची वैद्यकीय क्षमता अधिक बळकट झाली आहे.
सिझेरियनसह गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया यशस्वी
डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक रुग्णालयात नुकतीच सिझेरियन प्रसूती यशस्वीपणे करण्यात आली. माता व बाळ दोघेही सुखरूप असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय विविध गुंतागुंतीच्या स्त्रीरोगांवरील उपचार तसेच गर्भाशयाशी संबंधित शस्त्रक्रियाही यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.
रुग्णालयात आता गर्भवती मातांची विशेष काळजी घेण्याबरोबरच स्त्री व पुरुष वंध्यत्व, विविध स्त्रीरोग आणि प्रसूतीसंबंधी समस्यांवर उपचार व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. आयुर्वेदिक उपचारपद्धतीसोबत आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा येथे मिळणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राजू मसुरकर यांची सदिच्छा भेट
दरम्यान, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन डॉ. श्रीनिवास जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून विविध सुविधांची तसेच रुग्णालयातील समस्यांची माहिती घेतली.
रुग्णालयात डॉ. राजेश गुप्ता यांच्यासह विविध तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध झाल्याबद्दल मसुरकर यांनी समाधान व्यक्त केले. गोरगरीब रुग्णांना या रुग्णालयात चांगली वैद्यकीय सेवा मिळत असून पंचकर्म उपचाराची सुविधाही उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
पॅरॅलिसिसच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पंचकर्माची आवश्यकता असल्यास त्यानंतर फिजिओथेरपीसाठीही या रुग्णालयाचा उपयोग होत असल्याचे मसुरकर यांनी सांगितले. जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
