सरपंच पी. के. चौकेकर यांची मागणी
⚡मालवण ता.०५-:
मालवण तालुक्यातील चौके येथील जीर्ण व धोकादायक बनलेली प्रवासी निवारा शेड निर्लेखित करावी आणि नवीन प्रवासी निवारा शेड उभारावी, अशी मागणी चौके गावचे सरपंच पी. के. चौकेकर यांनी एसटी महामंडळ कणकवली विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या वर्षभरापूर्वी कणकवली विभागीय नियंत्रक यांना पत्राद्वारे ही बाब चौके ग्रामपंचायतीने निदर्शनास आणून दिलेली आहे. परंतु एसटी प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. जीर्ण झालेली धोकादायक निवारा शेडचा स्लॅब कोसळून कधीही दुर्घटना होऊ शकते. याची गंभीर दखल घेऊन एसटी प्रशासनाने तातडीने धोकादायक निवारा शेड निर्लेखित करून नवीन निवारा शेड बांधावी. तसेच ठिकाणी प्रवाशांसाठी सुलभ शौचालय बांधून मिळावे, अशी मागणी सरपंच पी. के. चौकेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
