मालवण (प्रतिनिधी)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी ओरोस येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११. ३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालय गेटसमोर हे आंदोलन होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीशी संबंधित विविध मुद्द्यांवर काँग्रेसने आक्षेप नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निर्देशानुसार देशभरातील जिल्हा पातळीवर निषेध आंदोलनांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे आंदोलन होणार आहे. देशातील इतर राज्यांमध्येही काँग्रेसकडून २८ सप्टेंबरला जिल्हा पातळीवरील आंदोलनांचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत.
या आंदोलनाला जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, ओबीसी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, INTUC यांसह विविध सेल व विभागांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
