Headlines

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात …

‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवलीचे सुहास तायशेटे यांना प्रदान..

⚡सावंतवाडी ता.२६-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठया उत्साहात झाला. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात यंदाचा ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवली येथील सुहास वसंत तायशेटे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष आनंद रासम, दयानंद उबाळे, प्राचार्य डॉ. विजय जगताप, सत्यजित साठे, डॉ. प्रशांत माळी, कणकवली तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव विवेक आपटे, स्वप्निल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी फार्मासिस्ट दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सत्यजित साठे यांनी भारताने औषधनिर्मिती क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत हा फार्मसी क्षेत्रातील प्रमुख औषध निर्यातदार देश असून या क्षेत्रात करिअरच्या संधी नेहमी वाढत्याच राहणार असल्याचे ते म्हणाले.

आनंद रासम यांनी फार्मासिस्टची बदलती भूमिका आणि या क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर भाष्य केले. कालानुरूप अभ्यासक्रमात होत असलेले बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी केवळ डिप्लोमा किंवा पदवीपर्यंत शिक्षण मर्यादित न ठेवता पदव्युत्तर शिक्षण तसेच डॉक्टरेट मिळविण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांच्या चर्चेतून योग्य व्यक्तीची निवड केली जाते. त्यानुसार यंदाच्या पुरस्कारासाठी कणकवली येथील सुहास तायशेटे यांची निवड करण्यात आल्याचे रासम यांनी जाहीर केले.

अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते सुहास तायशेटे यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तायशेटे कुटुंबीय गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून फार्मसी व्यवसायाशी जोडलेले असून तीन पिढ्यांनी हा वारसा पुढे नेला आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर तायशेटे यांनी आपले मनोगत असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद उबाळे यांच्यामार्फत व्यक्त केले. निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सचोटीने व्यवसाय केल्यामुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अच्युत सावंत भोसले यांनी सांगितले की संस्थेतर्फे गेल्या बारा वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहे. स्वतःचा व्यवसाय करत असतानाच सामाजिक व नैतिक मूल्यांची जपणूक करून व्यवसाय कसा करावा याचे आदर्श उदाहरण पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या कार्यातून मिळते. केवळ पदवी मिळविणे हा यशाचा अंतिम टप्पा नसून करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी अशा व्यक्तींकडून चांगल्या गोष्टी आत्मसात करून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. कार्यक्रमादरम्यान कॉलेजची वार्षिक स्मरणिका तसेच न्यूज लेटरचे प्रकाशन करण्यात आले. फार्मासिस्ट दिनानिमित्त कॉलेजमध्ये पिक्टोग्राम, स्लोगन, कार्टून, रील मेकिंग, रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी भिवशेट तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत माळी यांनी केले.

You cannot copy content of this page