⚡बांदा ता.२८-:
“समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि ती तत्वनिष्ठेने करा,” या श्री श्री १०८ महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेचे समाजोपयोगी कार्य उल्लेखनीय ठरत आहे.
महाराष्ट्र राज्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, रुग्णांना मदतीचा हात मिळावा आणि गरीब-गरजूंना आधार मिळावा या हेतूने संस्था सातत्याने कार्यरत आहे. याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून शिक्षणाची आवड असूनही प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या कु. भूषण वेगुर्लेकर (मुंबई) या विद्यार्थ्यास महाविद्यालयीन फी भरण्यासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
ही मदत संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व विश्वस्त बापू गावकर यांच्या शुभहस्ते उपासना केंद्रात चेक प्रदान करून देण्यात आली. यावेळी संस्थेचे खजिनदार राजन गावडे, सचिव भास्कर गावडे, नामदेव गावडे, सामाजिक संस्थेचे सचिव विजय साहील, सचिन धावडे तसेच सौ. रश्मी डिचोलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साहील यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर गावडे यांनी मानले.
