झोळंबे येथील पैठणीच्या खेळात प्रियांका परब ठरल्या विजेत्या…

⚡बांदा ता.२५-: नवरात्रौत्सव निमित्ताने श्रीदेवी माऊली मंदिर झोळंबे येथे आयोजित पैठणीच्या खेळात प्रियांका परब यांनी प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी मिळवली. शालन गवस हिने द्वितीय, तर सिध्दी गवस हिने तृतीय क्रमांक पटकावला.
पदवीधर शिक्षिका व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संदीप गवस यांच्या आयोजनातून माऊली मंदिराच्या सभामंडपात तब्बल सहा तास रंगलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन देवस्थान कमिटी अध्यक्ष शंकरराव गवस, सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, तंटामुक्ती अध्यक्ष सुखाजी गवस, प्रायोजक सुजाता गवस, माजी सरपंच राजेश गवस, मानकरी प्रकाश गवस, सतेज गवस आणि एन.डी. गवस यांच्या उपस्थितीत झाले.
झोळंबे गावात प्रथमच आयोजित या खेळात गावातील महिलांनी उत्साहाने सहभागी होत मनमुराद आनंद लुटला. सहभागी महिलांना गवस कुटुंबीयांकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांनाही सन्मानित करण्यात आले.
भविष्यात गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले. या कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन बांदा केंद्र शाळेचे शिक्षक श्री जे. डी. पाटील यांनी केले, तर उपशिक्षिका स्वाती पाटील, शितल गवस व जगदिश गवस यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी देवस्थान स्थानिक उपसल्लागार समिती झोळंबे व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page