कणकवली : राष्ट्रीय सेवा दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कणकवली महाविद्यालयात रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात परि. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देत वाहन चालविताना परवाना, हेल्मेट, सीटबेल्ट, वेगमर्यादा पाळणे आणि मोबाईलचा वापर टाळणे याबाबत मार्गदर्शन केले.
सहायक मोटार वाहन निरीक्षक मितेश माने यांनी मोटार वाहन अधिनियमातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहिती देत अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा शपथ घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे व अपघातमुक्त समाज घडविण्यास हातभार लावण्याचे वचन दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
