आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त कुणकेश्वर समुद्रकिनारी भव्य स्वच्छता अभियान संपन्न…!

देवगड, ता. २१ :
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सिंधू कन्या प्रभात कुणकेश्वर बचत गट प्रगती ग्राम संघ कुणकेश्वर व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त कुणकेश्वर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले.

या अभियानात तब्बल २८२ ग्रामस्थ, विद्यार्थी, अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, केवळ प्लास्टिक बाटल्यांचेच जवळपास २०० किलो तर इतर ओला व घनकचऱ्याचे सुमारे ३०० किलो इतके प्रमाण गोळा करून समुद्रकिनारी स्वच्छता साधण्यात आली.

सदर अभियानास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. जयप्रकाश परब, पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी श्री. अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी श्री. दीपक तेंडुलकर, तसेच श्री. कोलते यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीस शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.

या उपक्रमास सरपंच महेश ताम्हणकर व ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थ, कुणकेश्वर जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलचे शिक्षक-विद्यार्थी, बचतगट प्रतिनिधी, CRP, आशा, अंगणवाडी सेविका, तलाठी श्री. नाईक, देवस्थान ट्रस्ट व विकास सोसायटीचे पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती निर्माण झाली असून, आगामी काळात असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page