कुडाळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

झाराप येथील बँक ऑफ इंडिया एटीएम फोडी प्रकरणातील पाच आरोपींना २४ तासात अटक..

सिंधुदुर्गनगरी ता २०
झाराप (ता. कुडाळ) येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडी प्रकरणातील पाच संशयित आरोपींच्या मुसक्या जिल्हा पोलीस दलाने केवळ २४ तासांच्या आत आवळल्या आहेत. संशयित हे १९ ते २९ वयोगातील असून पाचही संशयितांना इंदापूर पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून विविध बँकांचे २७ एटीएम कार्ड, ४ मोबाईल फोन, इंटिंगा कार, पल्सर मोटारसायकल, ऑक्सिजन सिलेंडर, एलपीजी सिलेंडर, गॅस कटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक नयोमी साटम,उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस पोलीस अधीक्षक जयदीप पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहन दहिकर म्हणाले की, १८ सप्टेंबर रोजी पहाटे २.३५ वाजता नवी मुंबई येथील सेंट्रल कंट्रोल युनिटकडून कुडाळ पोलिस ठाण्यात फोनवरून एटीएममध्ये संशयास्पद हालचाल सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रात्रीची गस्त घालणारे अधिकारी व अंमलदार तात्काळ झाराप येथील घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान एटीएम रुममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला पांढऱ्या चिकटपट्टीने झाकल्याचे तसेच बाहेरील वायर कापल्याचे दिसून आले. परिसरात शोध घेतल्यावर जवळच्या नाल्यात ऑक्सिजन गॅस सिलेंडर, एलपीजी सिलेंडर आणि गॅस कटर अशी एटीएम फोडण्यासाठी वापरायची साधने मिळून आली.
सीसीटीव्ही फुटेजमधून दोन संशयितांची हालचाल स्पष्ट दिसली. त्यावरून बँकेचे अधिकारी गुरुप्रीत परमजीत सिंह यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५, ६२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी इंदापूर (जि. पुणे) येथून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात किरण बाळु चव्हाण (२९), विजय दिनानाथ जाधव (१९), मारुती गोविंद सुरवसे (१९) सर्व रा. वनगळी ता. इंदापुर, जि. पुणे, समाधान शहाजी यादव (२७) रा. बाबुळगाव ता. इंदापुर, जि. पुणे आणि औदुंबर राजकुमार शेलार (२७) रा. पळसदेव ता. इंदापुर जि. पुणे यांना त्यांचे राहते घरातुन ताब्यात घेण्यात आलेले आहे. ही कारवाई कुडाळ पोलिसांनी केली. त्यांना तपासात सायबर पोलिसांचीही मोलाची मदत झाली.

जप्त मुद्देमाल

संशयितांकडून विविध बँकांचे २७ एटीएम कार्ड, ४ मोबाईल, इंटिंगा कार (एम एच १२, एक्सक्यू २६९७), पल्सर मोटारसायकल, ऑक्सिजन व एलपीजी सिलेंडर, गॅस कटर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मालवण पोलीस ठाण्यातील गुन्हा उघड
यातील १ नंबर संशयिताच्यावर यापूर्वी कर्नाटक आणि इंदापूर येथे गुन्हे दाखल आहेत. तसेच मालवण पोलीस ठाण्यातील उघड झाला असून त्यात एटीएममधून १७ हजार रुपये फसवणूक करून काढल्याचेही निष्पन्न झाले असल्याचेही यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तर आणखी काही गुन्हे केले आहेत का याचाहि शोध घेण्यात येत असून आरोपींची कसुन चौकशी सुरु आहे असेही यावेळी स्पस्ट केले

You cannot copy content of this page