भाजपच्या सेवा सप्ताहानिमित्त मालवण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

बाबा मोंडकर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सेवा सप्ताहाची केली सुरुवात..

⚡मालवण ता.१७-:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्याचे ठरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार साजऱ्या होणाऱ्या या सेवा सप्ताहानिमित्त मालवण तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण फोवकांडा पिंपळ येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या समवेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, मंदार केणी, केदार झाड, बबलू राऊत, अशोक चव्हाण, रवींद्र टेंबुलकर, बाबू मांजरेकर, प्रमोद करलकर, पूजा करलकर, रवींद्र खानविलकर, रश्मी लुडबे, ललित चव्हाण, श्याम झाड, मुन्ना झाड, कॅलिस फर्नांडिस, मोहन कुबल आणि दिलीप सांगवेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या सेवा सप्ताहात मालवण शहरासह तालुक्यातील ३२ बूथवर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, युवा वर्गासाठी विविध शिबीरे यांचा समावेश आहे.

तसेच या सेवा सप्ताहाचा भाग म्हणून २० सप्टेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे सकाळी १० वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आयुष्मान भारत आणि आयुष्मान वयोवंदन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध असेल. आयुष्मान वयोवंदन कार्डचा लाभ ७० वर्षांवरील कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. त्याचे उत्पन्न कितीही असले तरी त्याला हे कार्ड दिले जाईल. या कार्डमुळे वर्षासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळतील. हे कार्ड काढण्यासाठी ७० वर्षांवरील व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. सोबतच आधार कार्ड आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर घेऊन येणे गरजेचे आहे, असे यावेळी मोंडकर यांनी सांगितले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, इसीजी तपासणी केली जाणार आहे, तसेच मोफत औषधांचे वाटपही केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सामान्य आणि मध्यमवर्गीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. मोंडकर यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page